Breaking News : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात ‘शाईफेक’, हिम्मत असेल तर समोर या – चंद्रकांत पाटील यांचे आव्हान

Breaking News : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर ‘शाईफेक’

पुणे : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची घटना काहीवेळापूर्वी घडली आहे.
महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वातावरण चांगलेच तापले असून चंद्रकांत पाटील यांना या अगोदर काळे झेंडे दाखवून ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला होता.

चंद्रकांत पाटील यांनी एका शालेय कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील, फुले, आंबेडकर यांनी भीक मागून शाळा सुरु केल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यात विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील आले होते. ते पदाधिकाऱ्यांच्या घरून बाहेर येत असताना त्यांच्या अंगावर शाई फेक करण्यात आली. यावेळी शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी त्वरित ताब्यात घेतले. चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाईफेक करण्यात आल्यानंतर त्यांच्या विरोधात मुर्दाबाद, मुर्दाबाद अश्या घोषणा देखील शाई फेकणाऱ्या व्यक्तीकडून देण्यात येत होत्या.

हा भ्याड हल्ला, हिम्मत असेल तर समोर या : चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर चंद्रकांत पाटील हे माध्यमांसमोर आले आणि माझ्यावर हा छुप्या पद्धतीने भ्याड हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष या प्रकरणी निषेध करणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला असून छुप्या पद्धतीने हल्ला करणाऱ्यांनी हिम्मत असेल तर समोर या असे आवाहनही त्यांनी केले.