दौंड (अख्तर काझी) : दौंड रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्याला आग लागल्याची घटना घडली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दल आणि स्थानिक रेल्वे पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.
दौंड रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक सहाच्या शेजारील रेल्वे ट्रॅकवर अनेक दिवसापासून थांबविण्यात आलेल्या बंद पॅसेंजर रॅक मधील एका डब्याला दुपारी 4.30 वा. च्या दरम्यान अचानक आग लागल्याने रेल्वे प्रशासनाची भंबेरी उडाली. मात्र रेल्वे आपत्ती व्यवस्थापना मधील सर्वच विभागाने घटनास्थळी धाव घेतल्याने व तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केल्याने तासाभरातच आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले. दौंड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने वेळीच मदत केल्याने पुढील अनर्थ टळला.
या रेल्वे मार्गावर हा रेक कित्येक दिवसापासून बंद अवस्थेत आहे तरीही या डब्याला आग लागली कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आगीची घटना आज दुपारी 4.30 वा. च्या सुमारास घडली. घटनास्थळावर उपस्थित असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे जवान अमोल साळवे यांच्या नजरेस ही बाब दिसली.
या वेळी अमोल साळवे यांनी धाडसाने स्वतः आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला तोपर्यंत खबर सर्वत्र पसरताच रेल्वे प्रशासनाचे ब्रेक डाऊन विभाग, गॅरेज अँड वॅगन, हाय व्होल्टेज ट्रॅक्शन डिस्ट्रीब्यूशन विभाग, आरपीएफ, जीआरपी तसेच सफाई कर्मचारी पथक घटनास्थळी पोहोचले व सर्वांनी मिळून आगीवर नियंत्रण मिळविले. आग नेमकी लागली कशामुळे व कोणामुळे हे मात्र समजू शकले नाही.