दौंड : दलित कुटुंबाला घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांच्यासह आठ जणांविरोधात ॲट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हा दाखल झाल्याने दौंड तालुक्यातील राजकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
दौंड पोलिसांनी,पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून राशिद इस्माईल शेख, वाहिद खान, अरबाज सय्यद, जुम्मा शेख, इलियास शेख, वसीम शेख, बादशहा शेख, जिलानी शेख व इतर 10 ते 12 यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती, नागरिक हक्क संरक्षण कायदा तसेच आर्म ऍक्ट कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी रात्री 7 ते 8 वा. च्या दरम्यान येथील कुंभार गल्ली परिसरात घटना घडली. फिर्यादी दळण दळण्यासाठी आरोपींच्या घरासमोरून जात असताना आरोपी राशीद शेख यांनी फिर्यादीच्या अंगावरील ओढणी ओढली व तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. फिर्यादीने घरी जाऊन आपल्या नातलगांना ही बाब सांगितली. फिर्यादी व नातलग आरोपींनी केलेल्या या कृत्याचा जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांना आरोपींनी मारहाण केली.
त्यामुळे फिर्यादी व त्यांचे नातलग घरी परतले. त्यानंतर सर्व आरोपींनी फिर्यादी यांच्या घरात घुसून कुटुंबाला तलवार व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. एका नातलगाला जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवारीने मारहाण करण्यात आली. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून आमच्या गल्लीत राहू नका अशी दमदाटी ही आरोपींनी केली. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस करीत आहेत.