Breaking News | समृद्धी महामार्गावरील अपघात प्रकरणी दोन आरटीओ (RTO) अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजी नगर : काल दि. 14 रोजी मध्य रात्री समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता ज्यामध्ये 12 जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर 24 जण गंभीररीत्या जखमी झाले होते. या अपघात प्रकरणी आता दोन आरटीओ (RTO) अधिकारी आणि आर टी ओ ने अडवलेल्या ट्रक चा चालक या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची महत्वाची माहिती हाती येत आहे. प्रदीप राठोड आणि नितीन गोणारकर असे या दोन आर टी ओ अधिकाऱ्यांची नावे असून ब्रिजेष कुमार चंदेल असे ट्रक चालकाचे नाव आहे.

रात्रीच्या सुमारास जांबरगाव टोल नाक्याच्या पुढे या दोन अधिकाऱ्यांनी ट्रक समोर जाऊन अचानक ट्रक अडवला त्यामुळे ट्रक चालकाने जोरात ब्रेक मारून ट्रक रस्त्यावर थांबवल्याने मागून येणारी टेम्पो ट्रॅव्हलर बस या ट्रकवर जोरात जाऊन आदळली ज्यामध्ये 12 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 24 जण गंभीर जखमी झाले होते.

रात्री अपरात्री आरटीओ पोलीस अधिकारी वाहने अडवून त्यांची तपासणी करतात मात्र ही तपासणी करताना अडविलेली वाहने रस्त्याच्या बाजूला घेणे गरजेचे आहे किंवा जी वाहने अडवली जातात ती वाहने अडवताना आर टी ओ अधिकारी थेट त्या वाहनांना आपली वाहने वेगात आडवी लावतात. त्यामुळे वाहनचालकांना स्वतःचे वाहन ब्रेक मारून जागेवरच थांबवावे लागते आणि मागून येणारे वाहन त्याला धडकून अपघात घडतो.

असाच प्रकार याही वाहणासोबत घडला असल्याची माहिती यातील जखमी देत असून या टेम्पो ट्रॅव्हलरने प्रवास करणारे सर्व प्रवासी हे नाशिक जिल्ह्यातील होते. तसेच हे सर्व प्रवासी बुलढाण्यातील बाबा सैलानींच्या दर्शनाला गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना त्यांच्या वाहनाला हा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिकांच्या मदतीने मतदकार्य सुरू करण्यात येऊन यातील जखमी झालेल्या २३ प्रवाशांना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.