|सहकारनामा|
दौंड : दौंड रेल्वे हद्दीतील जिंती रोड (जि. सोलापूर) रेल्वे स्थानकावर क्रॉसिंग साठी थांबलेल्या पंढरपूर- दादर एक्सप्रेसवर दरोडा टाकून प्रवाशांना लुटण्याचा दरोडेखोरांचा प्लॅन येथील रेल्वे सुरक्षा पोलिसांमुळे फसला. मात्र कारवाई दरम्यान दरोडेखोराने सहाय्यक फौजदार यांच्यावर चाकूहल्ला केल्याने ते जखमी झाले.
संतोष संजय काळे (वय 20,रा. भगत वाडी ता. करमाळा जी सोलापूर) या दरोडेखोरास जेरबंद करण्यात आले असून त्याचे इतर 5 साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहेत. पोलिसावर चाकूहल्ला करणाऱ्या अतुल्या डोंगऱ्या भोसले या आरोपीची ओळख पटली असून लोहमार्ग पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
घटनेबाबत दौंड लोहमार्ग पोलीस स्टेशन चे सहा. पो. निरीक्षक युवराज कलकूटगे यांनी दिलेली माहिती अशी की,दि.11 ऑ. रोजी रात्री 12.30 वा. दरम्यान पंढरपूर -दादर एक्सप्रेस जिंती रोड रेल्वे रेल्वे स्थानकात क्रॉसिंग साठी थांबली होती. त्यावेळी सहा दरोडेखोरांची टोळी गाडीतील प्रवाशांचे ऐवज लुटण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी आली. याच दरोडेखोरांच्या मागावर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक अमित जैन यांनी आपल्या सहकार्यांसह या ठिकाणी अंधारात दरोडेखोरांना पकडण्यासाठी सापळा रचलेला होता. त्यामुळे या पथकाने दरोडेखोरांवर झडप टाकीत त्यापैकी दोघांना जेरबंद केले. मात्र त्यामधील अतुल्या याने सहाय्यक फौजदार वाल्मीक पवार यांच्यावर चाकूने हल्ला केला व त्यांच्या तावडीतून सुटून पसार झाला. पोलिसांच्या तावडीमध्ये असलेल्या आपल्या साथीदाराला सोडविण्यासाठी दरोडेखोरांनी यावेळी पोलीस पथकावर दगडफेक केली. व अंधाराचा फायदा घेत ते पसार झाले. ताब्यात असलेल्या दरोडेखोराची झडती घेतली असता त्याच्याकडे दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांना मिळून आले आहे. पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला, दरोड्याचा प्रयत्न या कलमांतर्गत लोहमार्ग पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिंती,पारेवाडी रेल्वे स्थानकात गाड्या क्रॉसिंग साठी थांबल्या की याचा फायदा घेत थांबलेल्या गाडीतील प्रवाशांना लुटण्याचे काम हे दरोडेखोर करतात. त्यामुळे पोलिसांची या ठिकाणी नेहमीच गस्त असते. घटने वेळेसही पो. निरीक्षक अमित जैन व सहकारी रात्रीच्या गस्तीवर होते त्यामुळेच प्रवाशांना लुटण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न अयशस्वी ठरला.