दौंड : सहकारनामा ऑनलाईन(अब्बास शेख)
– दौंड तालुक्यातील दापोडी या गावामध्ये किरकोळ वादातून एका ३२ वर्षीय युवकाचा खून झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी यवत पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत यवत पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार या खुनातील आरोपी सिताराम शंकर गायकवाड आणि त्याचा चुलत भाऊ मयत सतीश माणिक गायकवाड (वय ३२, रा. कलनागर, दापोडी) या दोघांची ३ ते ४ वर्षे वय असणारी मुले एकत्र खेळत होती. खेळता खेळता त्यांच्यामध्ये भांडणे सुरु झाली. यावेळी सतीश गायकवाड यांनी मुलांना भांडणे का करता म्हणून ओरडले असता तेथे त्यांचा चुलत भाऊ सिताराम गायकवाड हा आला आणि सतीश गायकवाड याला तू माझ्या मुलावर ओरडतो काय असे म्हणत आज तुला जीवे मारतो असे म्हणून त्याने अगोदर लाकडी दांडक्याने आणि नंतर सतीश गायकवाड यांस ओट्यावर ढकलून दिले यामध्ये सतीश याच्या डोक्याला गंभीर मार लागून तो बेशुद्ध पडला. त्यावेळी त्याची पत्नी व इतर नातेवाईकांनी त्यांस यवत येथील सरकारी रुग्णालयात घेऊन गेले त्यावेळी डॉक्टरांनी सतीश गायकवाड यास मृत घोषित केले. या प्रकरणी मृत सतीश गायकवाड च्या पत्नीने फिर्याद दिली असून यवत पोलिसांनी आरोपी सिताराम गायकवाड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास यवत पोलीस करीत आहेत.