दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)
नागरिक हित संरक्षण मंडळ, आर पी आय, रासप आघाडीच्या नगराध्यक्षा शितल कटारिया यांना नगरपालिकेतील राष्ट्रवादी- शिवसेना युतीचे गटनेते बादशहा शेख यांनी दमदाटी करून अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ नागरिकहित मंडळाने नारी के सम्मान में नागरिक हित मैदान में म्हणत नगरपालिका आवारात मूक धरणे आंदोलन केले. तर त्यांच्या समोरील जागेतच 50 वर्षापासून शहराला लागलेले ग्रहण हटविण्यासाठी राष्ट्रवादी- शिवसेना मैदानात असे असे म्हणत युतीच्या वतीनेही धरणे आंदोलन करण्यात आले.
दोन्ही गटाच्या एकाच वेळेसच्या आंदोलनामुळे नगरपालिका इमारतीला अक्षरशः पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. दोन्ही गटाच्या आंदोलनाचा पवित्रा पाहता आगामी नगरपालिका निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजला असल्याचे संकेत मिळाले. आंदोलनानंतर नगराध्यक्षा शितल कटारिया व विरोधी गटनेते बादशहा शेख यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली.
आंदोलनाबाबत बोलताना शितल कटारिया म्हणाल्या की, मला संपूर्ण शहरातील मतदारांनी निवडून दिले आहे म्हणून शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणणे हे माझे कर्तव्य आहे, त्या अनुषंगाने मी गटनेते बादशहा शेख यांच्या प्रभागातील नागरिकांच्या विनंतीने तेथील समस्यांची पाहणी करण्या करिता मुख्याधिकारी यांना सोबत घेऊन निघाले असता बादशहा शेख यांनी दमदाटी व अवमानकारक भाषा करीत आम्हाला त्यांच्या प्रभागात जाण्यास मज्जाव केला. नगराध्यक्ष या नात्याने मी कोणत्याही प्रभागात जाऊन कामाची पाहणी करू शकते, त्यासाठी त्या प्रभागातील नगरसेवकाची परवानगी घेऊनच जावे असा काही नियम नाही.
परंतु 35 वर्ष नगरसेवक असलेल्या बादशहा शेख यांना नगरपालिका कामकाजाच्या नियमांची कोणतीच माहिती नसल्याने त्यांनी आम्हाला त्यांच्या प्रभागात जाण्यापासून दमदाटी करीत रोखले. बादशाह शेख फक्त आमच्यावरच दादागिरी करीत नाहीत तर नगरपालिकेतील प्रत्येक नगरसेवक, अधिकारी वर्गावर करीत असतात. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी महिला असताना शेख यांनी अपमानास्पद वागणूक व दमदाटी केली आहे. ते नेहमीच महिलांशी अशीच भाषा वापरतात व त्यांचा अवमान करतात. आपल्या बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा महिला आहेत, त्यांचा जर कोणी असा अपमान केला असता तर तो त्यांनी सहन केला असता का? असा प्रश्नही कटारिया यांनी उपस्थित केला.
आमदार राहुल कुल यांनी दौंड शहरासाठी आणलेल्या निधीतून शहराचा विकास होऊ नये या उद्देशाने बादशहा शेख प्रत्येक विकास कामात अडथळा आणत आहेत, शेख यांनी वेळोवेळी सुचविलेली कामे सुद्धा आम्ही मंजुरीसाठी घेत आलो आहोत तरी सुद्धा त्यांची आमच्यावर दादागिरी सुरुच आहे. त्यामुळे महिलांचा सतत अपमान व दमदाटी करणाऱ्या बादशहा शेख यांचे नगरसेवक पद रद्द व्हावे म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे सुद्धा मागणी केलेली आहे असेही कटारिया म्हणाल्या.
आपल्यावरील आरोपां बाबत बादशाह शेख म्हणाले की, शहरातील घनकचरा व्यवस्थापन व संकलन याचा बोजवारा उडाल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या नगराध्यक्ष शितल कटारिया यांचा राष्ट्रवादी, शिवसेना नगरसेवकांनी राजीनामा मागितलेला आहे, त्यामुळे राग मनात धरून त्यांनी आजचे आंदोलन केले आहे. तसेच नगरपालिकेत मी दादागिरी करीत नाही तर नगराध्यक्ष शितल कटारिया व त्यांचे कुटुंबीय हेच काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून नगरपालिकेच्या कामकाजात अडथळा आणतात म्हणून त्यांच्या शहरातील कायदा सुव्यवस्था बी घडविण्याच्या वृत्तीच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन केले आहे.
मी स्वतः नगराध्यक्षांचा वेळोवेळी सन्मान राखला आहे. पुण्याचे पालक मंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुण्यातील बैठकीस नगराध्यक्षांना कोणतेही निमंत्रण नसताना उलट मी त्यांना बैठकीस घेऊन गेलो आहे. माझ्या जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून झालेल्या कामाचे उद्घाटन मी नगराध्यक्षांच्या हस्ते केले आहे. त्यामुळे मी त्यांना अपमानास्पद वागणूक देतो हा आरोप खोटा ठरतो. संपूर्ण शहराची दुरवस्था झाली असताना फक्त माझ्या प्रभागात जाऊन कामाची पाहणी करून दोन दिवसात सुरू होणाऱ्या कामाचे श्रेय नगराध्यक्ष घेत आहेत हा त्यांचा हेतू ओळखून मी त्यांना माझ्या प्रभागात का चालला आहात असा प्रश्न विचारला, नगरपालिका कामकाजाच्या प्रोटोकॉल प्रमाणे त्यांनी माझ्या प्रभागात जाताना कमीत कमी मला सांगणे हे त्यांचे काम होते परंतु त्यांनी तसे केले नाही.
आणि दादागिरीचा विषय म्हणाल तर उलट कटारिया परिवाराने एका आंदोलनादरम्यान मला जीवे मारण्याचा कट रचला होता, मला त्यावेळी धक्का बुक्की सुद्धा करण्यात आली, दादागिरी मी नाही तर कटारिया करीत आहेत असेही बादशहा शेख म्हणाले.