केडगावच्या उपसरपंचांवर दोन्ही गटांचा दावा ! केडगाव ग्रामपंचायतीवर कुल-थोरात गटाचे ‘फ्लेक्स’ झळकले

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदावर कुल आणि थोरात अश्या दोन्ही गटांनी दावा केला असून दोन्ही गटाकडून उपसरपंच आपलाच असल्याचे फ्लेक्स केडगाव ग्रामपंचायतवर झळकविण्यात आले आहेत. त्यामुळे आता उपसरपंच नेमके कोणत्या गटाचे याचे उत्तर खुद्द उपसरपंचांना द्यावे लागणार आहे असे दिसते.

केडगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी केडगाव विकास आघाडीच्या सौ.पूनम गौरव बारवकर यांची मोठ्या मताधिक्क्याने निवड झाल्यानंतर केडगावमधील कुल-थोरात गटात एकच खळबळ माजली होती. कुल गटाचे शेळके विरुद्ध थोरात गटाचे शेळके असा सामना रंगत असताना येथे केडगाव विकास आघाडीच्या पूनम गौरव बारवकर यांनी मोठे मताधिक्य घेत येथे कुल-थोरात गटाला शह दिला होता. केडगाव विकास आघाडीमध्ये थोरातांना मानणारे मोठ्या प्रमाणात होते हे विशेष.

यामुळे केडगाव येथील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. हे होत असताना उपसरपंचपद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. येथे कुल 08, थोरात 03, अपक्ष 01, केडगाव विकास आघाडी 05+1 सरपंच असे बलाबल होते. त्यातच केडगाव विकास आघाडीने थोरात गटाच्या उपसरपंच पदाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने येथे थोरात गटाचा सरपंच होईल असे सांगितले जात होते. मात्र ऐनवेळी थोरात गटातील सदस्य फुटून ते कुल गटाला जाऊन मिळाले आणि येथे कुल पुरस्कृत उपसरपंच प्रशांत शेळके हे निवडून आले. त्यांचा शुभेच्छा फ्लेक्स विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या फोटोसह कुल समर्थकांनी लावत उपसरपंच हे कुल गटाचे म्हटले आहे. मात्र त्यांना थोरात गटातील सदस्यांनी साथ दिल्याने त्यांची उपसरपंच पदी निवड झाले असे म्हणत ते आमचेच आहेत असे म्हणून थोरात समर्थकांनी प्रशांत शेळके यांचा फ्लेक्स माजी आमदार रमेश थोरात आणि पुत्र गणेश थोरात यांच्यासह केडगाव ग्रामपंचायतवर लावला आहे. त्यामुळे आता उपसरपंच नेमके कोणत्या गटाचे आणि फ्लेक्स कुणाचा राहणार हे लवकरच समजणार आहे.