दौंड : दौंड तालुक्यात दिवसेंदिवस प्रदूषणामध्ये वाढ होत चालली असून याला काही अंशी प्लास्टिक जाळणारी गूळ उत्पादक गुऱ्हाळेहि जबाबदार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ज्या गुऱ्हाळावर प्लास्टिक जाळले जाईल त्यांना 10 हजार रुपये दंड ठोठवण्याचा उपक्रम बोरिपार्धी ग्रामपंचायतीने हाती घेतला आहे. त्यामुळे या प्रकारांना निश्चित आळा बसणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री एस.आर.पी.एफ (SRPF) चे जवान अमोल रूपनवर हे कामावरून घरी जात असताना त्यांना बोरीपार्धी येथील खताळ मळा येथे असणाऱ्या गुऱ्हाळावर जाळण्यासाठी प्लास्टिकचा वापर केला जात असल्याचे दिसले. त्यांनी त्वरित याची माहिती बोरिपार्धी ग्रामपंचायतीचे सरपंच सुनिल सोडनवर यांना फोन करून दिली. तसेच या गुऱ्हाळावर प्लास्टिक कचऱ्याचा वापर हा जाळण्यासाठी केला जात असल्याचे व्हिडीओ शूटिंग केले. काही वेळातच बोरीपार्धीचे सरपंच सुनील सोडनवर हे आपल्या मित्रांसह त्या गुऱ्हाळावर गेले त्यावेळी त्यांनाही तेथे प्लास्टिक जाळण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे त्यांनी संबंधित गुऱ्हाळ चालकावर 10 हजार रुपये दंडाची कारवाई केली.
याच कारवाईचे अनुकरण इतर ग्रामपंचायतींनी केल्यास तालुक्यात प्लास्टिक प्रदूषणाला आळा बसण्यास नक्कीच मदत होणार आहे.