अब्बास शेख
दौंड तालुका : कुणीही आजपर्यंत कसलेही आरोप करु शकला नाही अशी कोरी पाटी आणि स्वच्छ प्रतिमा असलेले आमदार पुत्र आनंद थोरात हे संपूर्ण तालुक्याला परिचित असलेले शांत, सय्यमी व्यक्तिमत्व आणि तितक्याच खुबीने आपल्या आजोबा, आणि वडिलांचा वारसा जपणारे आनंद थोरात यांचे चिरंजीव म्हणजे अभिषेक थोरात. याच अभिषेक थोरात यांना आमदार राहुल कुल गटाकडून जिल्हा परिषद च्या बोरिपार्धी – केडगाव गटाची उमेदवारी जाहीर झाल्याने विरोधी उमेदवारांना धडकी भरली आहे. अनेक विरोधी उमेदवारांनी आत्तापासूनच बोरिपार्धी येथे दररोज दोनवेळा हजेरी लावून अभिषेक थोरात हे उमेदवार किती तुल्यबळ आहेत याची प्रचिती आणून दिली आहे. निस्वार्थी कार्य, स्वच्छ प्रतिमा, गाव आणि परिसराचा विकास व्हावा यासाठी सतत धडपड आणि घरात राजकीय वारसा असतानाही कसलीच घमेंड नाही ही अभिषेक थोरात यांची जमेची बाजू मानली जात आहे.

कोण आहेत अभिषेक थोरात – अभिषेक थोरात यांचे आजोबा आणि आनंद थोरात यांचे वडील कै. काकासाहेब थोरात हे व्यवसायानिमित्त मुंबईला गेले आणि तेथे आपल्या कौशल्याची छाप सोडत आमदार म्हणून निवडून आले. काकासाहेब थोरात यांचे पुत्र आनंद थोरात यांनी शहरी भागातील जीवनमाणापेक्षा ग्रामिण भागातील जीवनमाणाला पसंती देत ते बोरिपार्धी येथेच राहिले तर वडिलांच्या नंतर मुंबईतील व्यवसायाची धुरा कै. काकासाहेबांचे द्वितीय पुत्र सदानंद थोरात यांनी आपल्या खांद्यावर घेतली. आनंद आणि सदानंद यांनी ग्रामिण भागातील शेकडो तरुणांना शहरात आपल्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देत बेरोजगार युवकांच्या रोजी रोटीचा प्रश्न मार्गी लावला आहे.
आनंद थोरात यांनी ग्रामिण भागातील लोकांना त्यांच्या सुख दुःखात कायम साथ दिली. केवळ लग्न आणि दहाव्याला हजेरी लावली म्हणजे आपण लोकांच्या अडचणी दूर केल्या असे होत नाही त्यामुळे गाऱ्हाणे घेऊन येणाऱ्या पंचक्रोशीतील प्रत्येकाची अडचण समोर बसून मिटविण्यावर आनंद थोरात यांनी भर दिल्याने लोकांची कोर्ट कचेरी आणि पोलीस स्टेशनचे होणारे हेलपाटे वाचून तंटे गावातच मिटवले गेल्याने अनेकांची खानदानी दुश्मनी संपुष्टात आली असल्याचे येथील गावकरी आवर्जून सांगतात.
ज्यावेळी गोरगरीब, छोटे मोठे व्यवसायिक आणि काहीतरी करायचे अशी स्वप्ने बाळगणारे तरुण केवळ आर्थिक परिस्थितीमुळे आपला व्यवसाय सुरु करु शकत नव्हते त्यावेळी तरुणांच्या रोजगारासाठी स्वतः बँक स्थापन करुन त्या बँकेमार्फत तरुणांच्या आणि छोट्या मोठ्या व्यवसायिकांच्या व्यवसायाला आर्थिक हातभार लावण्याची किमया आनंद थोरात यांनी साधली तर अभिषेक थोरात यांनी सुद्धा आजोबा आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ग्रामपंचायत चे मिळत असलेले सरपंच पद नाकारून आपल्यापेक्षा जेष्ठ असणाऱ्यांना ती संधी देण्यात यावी असे मत मांडत उपस्थितांची मने जिंकली होती.
प्रसिद्धी आणि झगमगाटापासून कायम दूर राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या आनंद थोरात आणि त्यांचे पुत्र अभिषेक थोरात यांनी कायम गोरगरीबांची मदत आणि अडचणीत आलेल्यांना सहकार्य केल्याने नागरिकांचा त्यांच्यावरील विश्वास द्विगुणित झाला आहे आणि त्यामुळे कोरी पाटी आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या अभिषेक थोरात या युवकाने विरोधकांना मात्र घाम फोडला आहे हे तितकेच खरे आहे.







