दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
दौंड शहरात पुन्हा आठ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे शहराची चिंता वाढतच आहे. शहरातील करोना चा संसर्ग वाढत असल्याने याठिकाणी 14 दिवसांचा लॉक डाउन लागू करण्यात आला आहे, परंतु तरीही बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. विशेषतः या महामारी ने झोपडपट्टी प्रभागात मोठा शिरकाव केला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने फक्त लॉक डाऊन वर अवलंबून न राहता शहरात बारामती पॅटर्न राबवावा अशी मागणी होऊ लागली आहे. बारामती मध्ये करोना ने शिरकाव केल्या नंतर तेथील प्रशासनाने कडक अंमलबजावणी सुरू केली. ज्या ठिकाणी बाधित रुग्ण सापडले तो संपूर्ण परिसर, प्रभाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला होता व या क्षेत्रामधून एकास ही बाहेर पडू दिले जात नव्हते तसेच या ठिकाणी जाण्यास कोणालाही परवानगी दिली जात नव्हती. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुद्धा बंद बंद ठेवण्यात आलेली होती. बारामती नगर पालिकेच्या वतीने येथील नागरिकांना संपूर्ण सेवा देण्यात येत होती. प्रशासनाच्या या कठोर अंमलबजावणी नंतर काही दिवसातच बारामती शहर करोना मुक्त झाले होते. हा पॅटर्न दौंड मध्ये राबविणे अत्यंत गरजेचे झाले आहे. शहरातील सर्व नगरसेवकांनी तसेच स्वयंसेवी संघटनांनी एकत्र येत प्रशासनाला या कामी मदत करणे आवश्यक झाले आहे. कोणाचीही भीड भाडं न ठेवता शहरात उपाय योजनांची कडक अंमलबजावणी झाली तरच दौंड करांची या महामारी तून सुटका होणार आहे अन्यथा यापेक्षाही भयंकर परिस्थितीला दौंड करांना सामोरे जावे लागेल.
दि ८जुलै रोजी शहरातील करोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ७२ व्यक्तींचे स्त्राव प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते त्यापैकी आठ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव आला आहे. वेताळ नगर, बिलावल परिसर, नेहरू चौक, रमापती नगर, वडार गल्ली,बोरावके नगर,भोईटे नगर या परिसरातील लोकांचा करोना बधितां मध्ये समावेश आहे.