चीनच्या ‛दादा’गिरीला, भारताचे डिजिटल स्ट्राईकने उत्तर



संपादकीय :-

चीनने आगळीक करत आपल्या देशाच्या भूभागावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेक सैनिकांनी सीमेवर आपले रक्त सांडत त्यांचा प्रतिकार केला आणि आपल्यापेक्षा दुप्पट सैनिकांचा खात्मा करून चीनला जशास तसे उत्तर दिले.

चीन यातून सावरत नाही तोच आता पुन्हा केंद्र सरकारने चिन्यांमध्ये लोकप्रिय असलेले आणि भारतामध्ये आपले प्रस्थ स्थापन करू पाहणाऱ्या सुमारे ५९ चिनी ॲपवर बंदी घातली. भारताने ही बंदी घालताच चीनच्या कंपन्यांमध्ये हडकंप माजला आहे.भारताने केलेल्या डिजिटल स्ट्राईकमुळे चीनच्या धोरणाला लगाम लागला आहे. कारण आपण काहीही केले तरी भारत आपल्याला काहीच करू शकत नाही असा गैरसमज चीन सरकारचा झालेला असावा त्यामुळेच की काय चीनची आगळीक वाढतच चालली होती. भारताने बंदी घातलेल्या ॲपमध्ये टिकटॉक ॲपचाही समावेश असून हे ॲप लहानांपासून ते मोठ्यापर्यंत अनेकांना वेड लावत होते. मात्र चीनचा आततायीपणा पाहून जनतेनेही या ॲपवर घालण्यात आलेल्या बंदीचे स्वागत केले आहे. या ॲपवर खुद्द माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम ६९ (अ) च्या तंर्गत बंदी घातली आहे. याचा अर्थ हे ॲप देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिनेही धोकादायक असल्याचे समोर येत आहे. आतातरी चीनने आपली आगळीक बंद करून गुण्यागोविंदाने वागावे अन्यथा जशी ॲपवर बंदी घालून डिजिटल सर्जिकल स्ट्राईक केला गेला त्यापेक्षाही मोठे उत्तर भारत देऊ शकते हे आता चीनने लक्षात ठेवायला हवे.

अब्बास शेख.

– मुख संपादक