प्रतिबंधित क्षेत्रातून या तालुक्यातील ‛हि’ गावे वगळली



थेऊर | सहकारनामा ऑनलाईन

पूर्व हवेलीतील लोणीकाळभोर, उरुळीकांचन या गावांचे प्रतिबंधीत क्षेत्र कंटेटमेंट झोन रद्द करण्यात आले असून येथे गेल्या 28 दिवसात एकही नविन कोरोना रुग्णाची नोंद झाली नसल्याने ही गावे यातून रद्द केल्याचे हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी आज जाहिर केले. 

कोरोना विषाणूचा संसर्ग पुणे शहरात झपाट्याने पसरत गेल्यानंतर शहरालगतच्या गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आले. यात उरुळीकांचन येथे पूर्व हवेलीतील पहिला रुग्ण सापडला त्यानंतर लोणी काळभोरसह कदमवाकवस्ती येथे रुग्ण आढळून आले. त्यामुळे ही गावे प्रतिबंधित करण्यात आली. परंतु गेल्या अठ्ठाविस दिवसात एकही रुग्ण आढळून आला नसल्याने उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी ही गावे यातून रद्द करण्यात आल्याचे घोषीत केले आहे. आज काढलेल्या परिपत्रकात पेरणे, लोणीकंद गावठाण, पिसोळी अंतुलेनगर, कोंढवे धावडे ग्रीन कंट्री सोसायटी परिसर याचाही समावेश आहे. येथील प्रतिबंधीत क्षेत्र हटवल्यानंतर अनेक अटी शिथील होऊ शकतील अशी आशा स्थानिक नागरिकांना आहे कारण गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण लाॅकडाऊन असल्याने अनेक सेवा देणारी दुकाने पूर्णपणे बंद आहेत.