लॉकडाऊन मधील विजबिल माफ करून जास्तीच्या बिलांची दुरुस्ती करा, अन्यथा : मनसे चा इशारा



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

करोना महामारीच्या दुष्परिणामांमुळे संपूर्ण देशाचे,राज्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळेच दौंड शहराची सुद्धा आर्थिक घडी पूर्णपणे कोलमडली आहे. लॉक डाऊन मुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या  आहेत,व्यवसाय ठप्प झाले आहेत, हातचा रोजगार गेल्याने नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा बिकट परिस्थितीत महावितरण कंपनीने नेहमी येणाऱ्या  वीज बिला पेक्षा तीन ते चार पट विज बिल आकारून लोकांच्या अडचणीत आणखीन वाढ केली आहे. महावितरण कंपनीच्या या भूमिकेचा दौंड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज(दि.4) निषेध नोंदविला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेत लॉक डाऊन काळातील विज बिल माफ करावे, आकारण्यात आलेली जास्तीची बिले दुरुस्त करून द्यावी याबाबत निवेदन दिले.

ग्राहकांच्या आर्थिक संकटाच्या काळात महावितरण जास्त बिल आकारते आहे आणि ग्राहकांनी  हे बिल न भरल्यास त्यांचे विजजोड खंडित केले जात आहे. हा सर्व प्रकार महावितरण कंपनीने थांबवावा तसेच लॉक डाउन काळातील वीज बिल माफ करावे व जास्तीचे आकारले गेलेले वीज बिल कमी करावे अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. पक्षाचे तालुका अध्यक्ष सचिन कुलथे, म.न. महिला सेनेच्या जिल्हा  उपाध्यक्षा प्रतिभा डेंगळे, अभिजीत गुधाटे,अझर कुरेशी, शिवसेनेचे संतोष जगताप, काँग्रेसचे महेश जगदाळे, विकास देशपांडे,अपूर्व लेले आदी उपस्थित होते.