धक्कादायक : बारामतीकरांची चिंता वाढली, आज दुसऱ्या कोरोनाबाधिताचा झाला मृत्यू



: सहकारनामा ऑनलाईन

बारामती तालुक्यातील माळेगाव येथे सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा आज मृत्यू झाला असल्याने बारामतीकरांची चिंता वाढली आहे.।कोरोना बाधित व्यक्तीचे वय ६० वर्षे असून त्यांचा आज शनिवारी  पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. याबाबत बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी ‛सहकारनामा’ला याबाबत माहिती दिली असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, खबरदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

त्यामुळे आता बारामतीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एकवरून दोन झाली आहे. बारामती नजीक असणाऱ्या माळेगाव येथे शुक्रवारी हा रुग्ण आढळला होता. या रुग्णाला किडनीचा त्रास होता त्यामुळे त्यास १६ तारखेला डायलिसिस करण्यासाठी पुण्याला पाठविण्यात आले होते त्यावेळी त्यांना कोरोना संबंधी कोणताही त्रास होत नव्हता मात्र काल त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांची तपासणी करण्यात आली व  घशातील द्रव्याचे नमुने पुढे पाठविण्यात आले होते. आज रिपोर्टमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले परंतु निदान झाल्यानंतर आज त्यांचा पुण्यात मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे झालेल्या या मृत्यूमुळे बारामतीच्या माळेगाव परिसरामध्ये असणाऱ्या नागरिकांची चिंता वाढली आहे.