लढाऊ ‛योद्धा’ जखमी झाला आहे, तलवार मात्र म्यान नाहीच..



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्याची अशी व्यक्ती ज्याचे व्यक्तिमत्वच लढवे आणि सामाजिक कार्यात गुंतले आहे. ज्यामुळे अनेकांना आरोग्य लाभून पुन्हा नव जीवनाचा आनंद घेता आला आहे. अशा या एका लढवय्या व्यक्तिमत्वाला आज कोरोनाची लागण झाल्याची माहिती वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरत आहे. लवकरच या बाबतची पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह अशी अधिकृत घोषणाही होईल. परंतु आज मात्र एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे ती म्हणजे या व्यक्तीवर त्यांचेच लोक नाही तर विरोधकही तेवढेच प्रेम करतात. कारण त्यांच्यावर प्रेम करणारे असो किंवा त्यांच्या विरोधातील असो सर्वचजण आज ‛गेट वेल सून, लवकर बरे व्हा’ अशा पोस्ट टाकून त्यांच्या प्रति आपले प्रेम आणि आपुलकी व्यक्त करत आहेत. या व्यक्तीने स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता आपले कार्य जन सामान्यांमध्ये सतत चालूच ठेवल्याने त्यांना हि बाधा झाली असावी आणि हे लवकरच समोर येणार आहे. मात्र त्यांना अनेकांनी काळजी घ्या, आराम करा असे मेसेज केले की मला काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो मी व्यवस्थित आहे आणि तुमच्या सोबत आहे असा दिलासादायक मेसेज समोरील व्यक्तींना देत अशा परिस्थितीमध्येही फोनवरून जनतेला येणाऱ्या अडचणी सोडविण्याची कामे सुरूच आहेत. डॉक्टर म्हणतायत आराम करा, मात्र मी आराम केला तर जनतेच्या अडचणी, त्यांची कामे कुणी करायची ?? असा प्रतिप्रश्न हे डॉक्टरांना करून निरुत्तर करत आहेत. होय, हा ‛योद्धा’ ही लढाई लढताना जखमी झाला आहे, परंतु त्याने तलवार मात्र म्यान केलेली नाही. तर प्रथम फळीत उभे राहून अजून जोमाने लढत आहे. त्यामुळे  सर्वसामान्य जनतेसाठी दिवस रात्र झटणाऱ्या या योध्याला काहीच होऊ शकत नाही, कारण अबाल वृद्ध, गोरगरीब, दिन दुबळे आणि सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद या योद्ध्याच्या पाठीशी आहेत.