‛कोरोना’मुळे शिक्षण क्षेत्रातही मोठे बदल अपेक्षित – प्रा.मंगेश कराड



लोणी काळभोर : सहकारनामा ऑनलाईन(शरद पुजारी)

कोरोना व्हायरसच्या हाहाकारामुळे जगातिक शिक्षण पद्धतीत मोठे फेरबदल होणार हे निश्चित, येणाऱ्या काळात विद्यापीठाने व विद्यार्थ्यांनी आपली मानसिकता बदलून बदलत्या तंत्रज्ञाननुसार भविष्यात संशोधन, नवनिर्मिती आणि कलात्मता हे गुण असलेले विद्यार्थ्यी घडविण्याची गरज आहे. त्याला पूरक ऑनलाईन अभ्यासक्रम तयार करण्याची आवश्यकता आहे.असे मत एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे  विद्यार्थ्यांशी व पालकांशी संवाद साधताना व्यक्त केले.

भविष्यात तंत्रज्ञान व इतर शाखेच्या शिक्षण पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. तसेच सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठाने संशोधनात्मक निर्माण करण्याच्या कामावर जोर दयावा. येणारा काळ आर्थिक मंदीचा असणार आहे. परिणामी खाजगी आणि सरकारी विद्यापीठाचे अर्थकारण कोसळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात कपात करावी लागेल.

कोरोना व्हायरसच्या नंतरची परिस्थिती ही संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक संधी असणार आहे. त्यांना केवळ तज्ञ शिक्षकांच्या शिक्षणाची गरज भासणार आहे. शिक्षकांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण व प्रशिक्षण द्यावे लागणार आहे.

काळाची पावले ओळखून एमआयटी एडीटी विदयापीठाने टाटा कन्सलट्न्सीसोबत शिक्षण व्यवस्थापन ही शिक्षण पद्धती सुरू केली आहे. ही पद्धती सर्व खासगी आणि सरकारी विद्यापीठांनी आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. देशात कोरोनासह अनेक समस्या आहेत. त्याच्या निराकरणासाठी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घ्यावे.

कोविडनंतर वैद्यकीय शाखेचा विस्तार होणे गरजेचे असून सरकारने वैद्यकीय शिक्षणाची पाॉलिसी बदलावी. कोरोना व्हायरसने मानवी जीवनाच्या सर्वच बाजूंवर प्रभाव टाकला आहे. या रोगाला अजून प्रतिजैविके न सापडल्यामुळे रोग होऊ नये, म्हणून प्रतिबंधक उपाय योजणे एवढाच आता सर्वांसमोर पर्याय आहे. म्हणून लॉकडाउनचे धोरण अवलंबून हा रोग आटोक्यात आणण्याचा सर्व देशांत प्रयत्न चालू आहे. या परिस्थितीतून निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.