मुंबई : सहकारनामा ऑनलाईन
आज सायंकाळी मुंबईतील वांद्रे स्टेशनच्या बाहेर हजारों मजूर कामगारांचा जमाव मोठ्या संख्येने जमला होता. बाहेर राज्यातून कामासाठी आलेले अनेक कामगार हे गावी जाण्यासाठी येथे जमले असल्याची माहिती मिळत आहे.
यावेळी हजारो मजूर कामगारांनी एकत्र जमून त्यांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी गाडी सोडण्याची मागणी करत असल्याचे सांगितले जात आहे. आज १४ तारीख असली तरी लॉकडाउनची मुदत ३ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. या लोकांना गावी जायचे असल्याने त्यांचा संयम सुटल्याचे दिसून येत होते. वांद्रे स्टेशनबाहेर हजारो लोक जमून लांब पल्याची गाड़ी सोडण्याची मागणी करत होते. आजूबाजूच्या कारखान्यांमध्ये काम करणारे हे कामगार असून अधिकतर यूपी, बिहारचे असल्याचे समजत असून तेथील जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तेथील पूर्णपणे गर्दी ओसरली आहे.