..तर त्या ‛कोरोना’ पीडितांच्या आत्महत्यांना जबाबदार कोण? आपण तर नाही ना!



संपादकीय :

दौंड तालुका हा तसा नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला सधन तालुका म्हणून याची ओळख आहे. या तालुक्याला राष्ट्रीय महामार्ग, नदी, कॅनॉल, रेल्वे हे नशीबाने खुप लवकर मिळाले त्यामुळे येथील शेतकरी, कामगार, व्यावसायिक लोकांचे जीवनमान उंचावून भरभराट झाली. या तालुक्यामध्ये क्वचितच कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या होत असतील असे कमाईचे सोर्स या तालुक्याला लाभले. मात्र आज या सर्व गोष्टींचा उहापोह करण्याचे कारण म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून मनाला एक चटका लावून गेलेली घटना घडलीय आणि त्यामुळे एक प्रश्न मनाला सतत भेडसावतोय तो म्हणजे या तालुक्यातील एका व्यक्तीने त्याच्या कुटुंबात सर्व व्यवस्थित सुरू असताना तो सुशिक्षित आणि चांगल्या ठिकाणी कामाला असतानाही त्याने आत्महत्या का केली असावी?? उत्तर तर सर्वांनाच माहीत आहे की कोरोना रोगाला वैतागून त्याने आत्महत्या केली असे वृत्तही प्रसिद्ध झाले! पण मग प्रश्न हा आहे की ती व्यक्ती तर बरी होऊन घरी परतली होती मग कोरोना त्याला जबाबदार कसा असेल? यात अजून खोलात गेले तर मात्र भयाण वास्तव समोर येते आणि ते म्हणजे कोरोना बाधा झाल्यानंतर त्यातून बाहेर आल्यानंतरही त्या रुग्णाला सामाजिक स्तरावर मिळणारी तुच्छतेची वागणूक! होय अनेकांना हे पटणार नाही मात्र हे वास्तव आहे. आपण कुणालाही फोन लावला तर रिंग वाजण्याच्या अगोदर एक टोन ऐकायला मिळते ती म्हणजे कोरोनाशी सामना करताना आपल्याला रोगाशी लढायचे आहे, रोग्याशी नाही. मात्र  या रोगाचे नाते त्या रोग्याशी कायमचे जोडून त्यातून जो इतका भयानक अर्थ काढला गेला आहे, पसरवला गेला आहे की त्यामुळे ज्याला कोरोना झाला तो आणि त्याचे कुटुंब थोडक्यात अघोषितरीत्या समाजातून बहिष्कृतच होते. त्यास ना कुणी फोन करून विचारपूस करते, ना कुणी त्यांना दूध, भाजी, तरकारी द्यायला जाते एवढेच काय तर स्वच्छ पाणी सुद्धा त्यांना घरपोच मिळत नाही अशी अवस्था या कोरोना मधून नीट झालेल्या लोकांच्या वाट्याला येतेय आणि हे मी म्हणत नाहीये तर ज्यांना कोरोना झाला आणि त्यातून जे बरे होऊन घरी आले हे त्यांना आलेले अनुभव सांगतोय. याबाबत तालुक्यातील एका डॉक्टरांनी त्यांना आलेला अनुभव कथन केला आहे ते ऐकताना आणि वाचताना अंगावर शहारे उभे राहतात. आपण नेमक्या कोणत्या काळात वावरतोय हेच समजत नाही. तीस-तीस, चाळीस-चाळीस वर्षे ज्यांनी रुगांची सेवा केली त्यांना जर या तुच्छतेचा इतका मोठा मानसिक धक्का सहन करावा लागत असेल तर मग सर्वसामान्याला आत्महत्या शिवाय दुसरा काही पर्याय दिसू शकतो का असा विचार करूनच मन सुन्न होते

आपण समजून घेतले पाहिजे की कोरोना काय आहे, तर ती एक वैश्विक महामारी आहे. तो कुणालाही होऊ शकतो, मोठं मोठ्या देशांच्या पंतप्रधानांना तो झाल्याचे आपण बातम्यांमधून वाचतो आहे. मग त्यांच्याशीही तुच्छतेने आपण वागणार का?

हा कोरोना ज्याला झाला तो समाज व्यवस्थेत जसा काय इतका मोठा गुन्हेगार  ठरतो की त्याला आणि त्याच्या परिवाराला अघोषितपणे तुच्छतेची, वाळीत टाकल्याची वागणूक मिळू लागते आणि त्यामुळे तो कोरोनाला हरवून आलेला असतानाही त्यास मिळत असलेल्या वागणुकीमुळे  त्याला आपले प्राण आणि जीवन नकोसे वाटू लागते आणि तो आत्महत्ये सारखे टोकाचे पाउल उचलतो. यासाठी आता समाजानेच ठरवायचे आहे की आपली लढाई रोग्याशी नसून रोगाशी आहे अन्यथा समाजव्यवस्थेतून अघोषित बहिष्कृत झालेल्या कोरोना रुग्णांच्या कुटुंबातील लोकांच्या आत्महत्या वाढल्या तर नवल वाटायला नको. आणि याला जबाबदार पण आपणच असु त्यामुळे कोरोना पीडीत आणि त्यांच्या कुटुंबियांशी तुच्छतेने नव्हे तर आपुलकीने वागणे हे त्यांना नव संजीवनी देणारे ठरेल यात शंका नाही.

अब्बास शेख

– मुख संपादक

सहकारनामा