अफवा पसरविणाऱ्यांना गृहमंत्र्यांचा कडक इशारा



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

राज्यात कोरोनाने लोकांना हैराण केले असताना आता व्हाट्सअप आणि फेसबुकसह इतर समाजमाध्यमांवरून पसरविण्यात येत असलेल्या अफवांमुळे नागरिक जास्तच भयभीत होताना दिसत आहेत. 

अनेक समाज माध्यमांवर पुणे, मुंबईत सैन्य तैनात करण्यात येणार असल्याची अफवा पसरवली गेली आहे. ही बातमी नसून अफवा आहे आणि ही अफवा  पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिला आहे. याबाबत अनिल देशमुख यांनी ट्विट करत हा इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये आज गृह मंत्रालयाच्या लक्षात आले की काही गन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्ती नागरिकांमध्ये दहशत आणि असंतोष निर्माण करण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट बातम्या आणि अफवांची एक मोहीम चालवत आहेत. कोरोनाचे संकट समोर असताना या अफवा पसरवल्या जात आहेत. ज्यामध्ये भारतीय सैन्य मुंबई व इतर शहरांवर संपूर्ण संचार बंदी लागू करण्यासाठी तैनात होणार असल्याचे या अफवेत म्हटले गेले आहे. त्यामुळे लोकांना गरजेच्या असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यास सांगितले जात आहे. ही बातमी खोटी असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं असून नागरिकांनी अशा मेसेजवर विश्वास ठेवून नये किंवा इतरांना फॉरवर्ड करू नये असे आवाहन करत या अफवा पसरवल्यास आयटी कायदा आणि आयपीसी या दोन्ही तरतुदी नुसार दंड आणि शिक्षा होऊ शकते असा इशारा दिला आहे.