थेऊर : सहकारनामा ऑनलाईन(शरद पुजारी) लाॅकडाऊनच्या काळात अनेक छोट्या मोठ्या व्यवसायावर आघात झाले परंतु ज्यांनी कर्ज काढून तीन आसनी व सहा आसनी रिक्षा खरेदी करुन आपल्या उदरनिर्वाहाची सोय केली अशा व्यवसायिकावर सध्या उपास मारीची वेळ आली आहे. यावर आपला संसार तर चालतोच पण रोजंदारीचा प्रश्न मार्गी लागला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात व्यवसाय तसेच खाजगी व सार्वजनीक वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे त्यामुळे दररोज रस्त्यावर धावणार्या तीन आसनी व सहा आसनी रिक्षा जागेवर उभ्या आहेत. यातून मिळणार्या उत्पन्नातून दैनंदिन व्यवहार पूर्ण केले जातात. बहुतेक व्यवसायिक बँकेतून कर्ज काढून रिक्षा घेतात त्यामुळे त्याचे हप्ते तसेच घरभाडे आदी साठी पैशाची चणचण भासत आहे. शासनाने अशा छोट्या व्यवसायिकासाठी काही आर्थिक मदत दिली तर मोठा दिलासा मिळेल कारण हे लाॅकडाऊन आणखी किती दिवस चालणार याची शाश्वती नाही. या विषयी चिंतामणी सहा आसनी संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर वैराट म्हणाले की आजची रिक्षाचालकांची परिस्थिती अतिशय वाईट आहे घरगाडा कसा चालवायचा हा मोठा प्रश्न आहे. घरात लहान मुले वयस्क आईवडील यांच्या दररोजच्या खर्चासाठी पैसे नाहीत. त्यामुळे हालाखिच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते आहे, शासनाने थोडीफार आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे.