केडगावमध्ये आजपासून या ‛सहा’ रस्त्यांवर ‛नाकाबंदी’



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील केडगावमध्ये आजपासून केडगावमध्ये प्रवेश करणाऱ्या सहा रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली असून या ठिकाणी ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते थांबून केडगावमध्ये येणाऱ्या आणि केडगावमधून जाणाऱ्या वाहनांची नोंद आपल्या वहीत करत असून जर कोणतेही अत्यावश्यक काम नसताना कुणी मोकाट फिरण्याचा प्रयत्न करत असेल त्यास प्रतिबंध केला जात आहे.



कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता केडगाव परिसरातील वाखारी-आंबेगाव, केडगाव-बोरीपारधी, टोलनाका-हंडाळवाडी, केडगाव-खुटबाव शिव रस्ता, केडगाव मुख्य रस्ता तसेच केडगाव ते वाडी वस्त्यांवरून बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर हे चेकपोस्ट नाके बसविण्यात आल्याची माहिती केडगावचे सरपंच अजित सोमनाथ शेलार पाटील यांनी दिली आहे. दौंड तालुक्याच्या आजू बाजूला असणाऱ्या तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर आणि अनोळखी लोकांवर लक्ष ठेवले जात आहे. कोणतेही ठळक कारण असल्याशिवाय अशा लोकांना आता प्रवेश देताना सर्व पडताळणी केली जात आहे.