करोना’ने झोपडपट्टी प्रभागात शिरकाव केल्याने दौंडकरांचा जीव धोक्यात, बेजबाबदार नागरिकांमुळे प्रशासन हतबल



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

करोना महामारी च्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये शहरात एक, दोनच करोना बाधित रुग्ण आढळून आले  होते मात्र सध्या करोना ने शहरात अक्षरशः धमाकुळ घालायला सुरुवात केली असल्याची सध्या परिस्थिती आहे. शहरातील झोपडपट्टी प्रभागांमध्ये या महामारीचा शिरकाव होऊ नये म्हणून प्रशासनाने चांगली काळजी घेतली होती. आज मात्र करोनाने झोपडपट्टी प्रभागातच शिरकाव केल्याने रुग्णांची संख्या रोज वाढतच आहे त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. मागील दोन तीन दिवसातच 40 पेक्षा अधिक लोकांना करोनाची बाधा झाली आहे. तसेच मृतांची संख्या सातवर पोहोचली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात घबराटीचे वातावरण आहे. उच्चभ्रू वस्ती पासून झोपडपट्टी प्रभागात करोनाचा सुसाट प्रवास सुरू झाल्याने प्रशासनाच्या अडचणी वाढत आहेत. करोनाला सहज घेणाऱ्यांची संख्या शहरात जास्त असल्यानेच शहरावर मोठे संकट आले आहे. अशिक्षित आणि शिक्षित अशा दोन्ही प्रकारातील बेफिकीर वृत्तीच्या लोकांमुळेच प्रशासनाची डोकेदुखी वाढली  आहे. प्रशासनाने अनेकदा आवाहन करून सुद्धा नागरिकांमध्ये गांभीर्य नाही व म्हणूनच शहरातील महामारीची साखळी तुटण्या ऐवजी अजूनच मोठी होत आहे. शहरातील रोज वाढती रुग्णसंख्या व हतबल झालेले प्रशासन अशी परिस्थिती पाहून तरी दौंड करांनी शहाणे व्हावे व जरा तरी जबाबदारीने वागावे अशी सांगण्याची वेळ आली आहे.