दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
दौंड शहरातील सर्वच भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ लागल्याने बाधित रुग्णांची संख्या रोजच वाढत आहे. त्यामुळे दौंड करांच्या चांगल्या आरोग्यासाठी व हितासाठी शहरात पुन्हा लॉक डाऊन लागू करण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावा अशी मागणी दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी केली आहे. शहरात आज पर्यंत 24 बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. दौंड शहराच्या मानाने ही संख्या निश्चितच सर्वांची काळजी वाढविणारी आहे. शहरातील सर्वच भागातून करोना रुग्ण आढळून येत असल्यामुळे संसर्गाची ही साखळी खंडित करण्यासाठी शहर लॉक डाऊन चा पर्याय उत्तम असु शकतो असे मंगेश शिंदे यांचे मत आहे. दौंड नगरपालिकेने शहर लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतल्यास आमचा त्यास पाठिंबा राहील व आम्ही प्रशासनाला पूर्ण सहकार्य करू अशी भूमिका दौंड व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेंद्र ओझा व दौंड मर्चंट असो. चे अध्यक्ष राजेश पाटील यांनी मांडली आहे. शहर किमान तीन दिवस कडकडीत बंद ठेवावे व यावेळी अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सुद्धा बंद बंद ठेवावीत जेणेकरून संपूर्ण बाजारपेठच बंद राहून त्याचा परिणाम चांगला मिळेल अशी मागणी सुद्धा नागरिक करू लागले आहेत. नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस व नागरिक हित संरक्षण मंडळ या दोन्ही गटाने एकत्र येत दौंड करांच्या हिताच्या दृष्टीने प्रभावकारी निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा दौंडकर व्यक्त करीत आहेत.
धडकी भरविणारा शहरातील रुग्णांचा आकडा…
मागील दोन दिवसात रुग्णांच्या संपर्कात आलेल्या साधारणतः 125 जणांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येणे बाकी आहे त्यामुळे आणखीन किती रुग्ण बाधित होतील याची भीती व्यक्त केली जात आहे.