‛त्या’ पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीमुळे गरीब कुटुंबांना मिळाला मोलाचा आधार, पुणे ग्रामीण पोलिसांचा स्तुत्य उपक्रम



पुणे : सहकारनामा ऑनलाईन(अब्बास शेख)

पोलीस अधिकारी म्हटले की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. पोलीस म्हणजे रागीट, खेकसणारा, वेळ पडलीतर काठीने बदडून काढणारा अशी सर्वसामान्यांची धारणा असते मात्र पोलिसालाही माणुसकी असते, तोही तुमच्याच समाजातील एक अंग आहे आणि त्यालाही तुमच्या व्यथा आणि अडचणी पाहून दुःख होते परंतु तो आपल्या भावना शक्यतो कधी व्यक्त करत नाही मात्र ज्यावेळी जनतेला खरेच एखाद्या गोष्टीची गरज असते त्यावेळी तो त्यांची ती गरज आपल्या ऐपतीप्रमाणे पूर्ण करायलाही मागे पुढे पाहत नाही आणि असाच एक पोलिसांची प्रतिमा उंचावणारा उपक्रम राबवला आहे पुणे ग्रामीणच्या आळेफाटा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी. 



कोरोनामुळे सर्वत्र भीषण परिस्थिती झाली असल्याने हातावर पोट असणारी अनेक गरीब कुटुंबे दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करत आहेत. अनेकांच्या घरामध्ये अन्न, धान्य आणि किराणाही उरलेला नाही हीच गरज ओळखून आळेफाटा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी स्वखर्चान गरीब व गरजू लोकांना किराणा साहित्य वाटप करून एक आदर्श निर्माण केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुजावर यांनी दाखविलेल्या या माणुसकीबद्दल त्यांचे सर्वत्र  कौतुक होत आहे. पोलिसांची जनतेमध्ये निर्माण झालेली चुकीची प्रतिमा अश्या उपक्रमांनी नक्कीच उजळून निघेल यात शंका नाही.