पाणी वापराबाबत ग्रामीण भागातील जनतेवरच अन्याय का? सर्वांना समान पाणी वाटप करावे : आ.कुल यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

ग्रामीण भागात ४० ली. प्रतीमाणसी व शहरी भागात १३५ ली. प्रतीमाणसी पाणी वाटपाच्या मापदंडामध्ये अशी तफावती असून यामुळे ग्रामीण भागातील जनतेवर अन्याय होत असल्याने त्यामध्ये बदल करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी आमदार कुल यांनी मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे.

यावेळी आमदार कुल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या १९९६ च्या बृहत आराखड्यानुसार, ग्रामीण भागातील जनतेला दरडोई दरदिवशी ५५ लीटर पाणी या दराने पाणी पुरवठा करण्याबाबतचा मापदंड निश्चित केला होता. २००४ सालापासून जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या जलस्वराज्य कार्यक्रमामध्ये, हाच मापदंड दरडोई दरदिवशी ४० लीटर पर्यंत खाली आणण्यात आला. बृहत आराखड्यानुसार शहरी भागातील नागरीकांना, संबधीत शहराच्या दर्जानुसार दरडोई दरदिवशी १३५ लीटर पाणी पुरवठा करण्याबाबतचा मापदंड स्विकारण्यात आला आहे. यामध्ये ग्रामीण व शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणवर तफावत आहे. तरी ग्रामीण व शहरी भागातील प्रतीमाणसी पाणीवापर मापदंडातील तफावतीबाबत वस्तुनिष्ठ विचार करण्यासाठी तज्ञ समिती स्थापन करून ग्रामीण व शहरी भागतील समन्यायी पाणी वाटप होण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावे असे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना नुकतेच पाठवले आहे.