दौंड मधील नियोजित बुद्ध विहाराच्या जागेत बेवारस प्रेतांचा दफन विधी!नगरसेवक गौतम साळवे यांची कारवाईची मागणी



दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

शासनाच्या वैशिष्टपूर्ण योजने अंतर्गत तब्बल 3 कोटी 82 लाख रुपये खर्चाच्या बुद्धविहाराचे काम सध्या दौंड मध्ये सुरू आहे, मात्र या बुद्ध विहाराच्या जागेमध्ये बेवारस प्रेतांचे दफन होत असल्याची धक्कादायक बाब नगरसेवक गौतम साळवे यांनी उघडकीस आणली आहे. नगरपालिकेने याठिकाणी बेवारस प्रेते दफन करण्यास प्रतिबंध करून प्रेते दफन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी साळवे यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दौंड नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 1 मध्ये बुद्ध विहाराच्या आरक्षित जागेत वेळोवेळी प्रतिबंध करून देखील याठिकाणी बेवारस प्रेते दफन केली जात आहेत. सध्या या जागेत प्रस्तावित बुद्धविहाराचे बांधकाम चालू असताना सदर जागेत बेकायदेशीर रित्या प्रेते दफन करणे चुकीचे व संतापजनक असल्याने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, सदरची जागा दिनांक 22/ 11/ 2018 रोजी जरी बुद्ध विहारासाठी आरक्षित झाली असली तरी याठिकाणी बेवारस प्रेते दफन केली जात होती त्याचप्रमाणे नगर परिषदेचा कचरा संकलन करणारा ठेकेदार सुद्धा सदर जागेत बेकायदेशीरपणे कचरा टाकत होता.

दि.13/8/2019 रोजी तत्कालीन मुख्याधिकारी यांना पत्र देऊन सदर जागेत प्रेते दफन करणाऱ्यांवर व कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केलेली होती. परंतु संबंधितांवर कोणतीही  कारवाई न करता त्यांना फक्त तोंडी समज देण्यात आली त्यामुळे कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराने कचरा टाकण्याचे बंद केले. त्याचप्रमाणे मा. तहसीलदार व  ग्रामीण रुग्णालयाने बेवारस प्रेत दफन करण्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते परंतु आजही सर्व बेवारस प्रेते बुद्ध विहाराच्या जागेतच राजरोसपणे दफन केली जात आहेत. 

अशा प्रस्तावित पवित्र जागेत बेवारस प्रेते दफन करणे म्हणजे एका ठराविक समाजाच्या भावना हेतुपूर्वक दुखावण्याचे काम राजरोसपणे चालू आहे, संतापजनक कृत्य करणाऱ्या संबंधितांवर नगरपालिकेने कायदेशीर कारवाई करावी अन्यथा बौद्ध समाजाकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही साळवे यांनी निवेदनातून दिला  आहे.