दौंड शहराजवळ ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात, मुलाचा मृत्यू तर आई गंभीर



देऊळगावराजे : सहकारनामा ऑनलाईन (प्रशांत वाबळे)

दौंड तालुक्यातील लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील मसणेरवाडी नजीक आज दुपारच्या सुमारास दुचाकी-ट्रकमध्ये भीषण अपघात होऊन मुलगा ठार तर आई गंभीर जखमी झाली आहे. याबाबतची माहिती दौंड  पोलिसांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार मालवाहतूक करणाऱ्या ट्रक क्र एम एच ४२बी-९९३१ व होंडा शाइन क्र एम एच ४२ए वाय २०३१ या गाडीचा समोरासमोर अपघात झाला. ट्रक चालक हा दौंड शुगर कारखान्याकडून दौंडच्या दिशेने निघाला होता तर दुचाकी वर असलेले आई व मुलगा दौंडकडून हिंगणीबेर्डी ता. दौंड या आपल्या गावी निघाले होते पण लिंगाळी हद्दीतील मसणेरवाडी ओढ्याजवळ वळणाला समोरासमोर धडक होऊन यामध्ये नितीन गौतम माने (वय वर्ष २०) याचा मृत्यू झाला असून आई सुलाबाई गौतम माने वय (वर्षे ४५ ) गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. सदर मालवाहतूक ट्रक शेजारील ओढयात मध्ये जाऊन कोसळला आहे. अपघातानंतर ट्रकचालक फरार असून अज्ञात ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक तेजस मोहिते करीत आहेत