यवतमध्ये कोरोना रुग्ण सापडलेला नाही, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रासगे



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील यवत या गावामध्ये अजूनतरी कोणताही कोरोना बाधित रुग्ण सापडलेला नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी सहकारनामा च्या माध्यमातून केले आहे. यवत हे मोठे गाव असून हे गाव पुणे-सोलापूर महामार्गावर  वसलेले असल्याने येथे नागरिकांची कायमच ये जा असते. येथे अनेक दवाखाने असल्याने बाहेर गावातील रुग्णही येथे उपचार घ्यायला येत असतात मात्र हे रुग्ण येथून गेल्यानंतर त्यांच्या आजाराबाबत माहिती न घेता काहीजण सोशल मीडियावर अफवा पसरवत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेकांनी यवतमध्ये कोरोना रुग्ण सापडला अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर प्रसारित केल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण होत आहे. त्यामुळे अशा मेसेजेसवर कुणीही विश्वास ठेवू नये आणि जोपर्यंत आरोग्य अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती दिली जात नाही तोपर्यंत कुणीही असे मेसेज फॉरवर्ड करू नये आणि अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.