ग्रामीण भागामध्ये जीवनावश्यक वस्तूंची व्यापाऱ्यांकडून कृत्रिम टंचाई! ‛सरकारने’ आदेश काढण्याची आ.कुल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

– कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून केंद्र आणि राज्यसरकारने लॉकडाउनची घोषणा केली मात्र या लॉकडाउनचा गैरफायदा घेण्यास काहींनी सुरुवात केली आहे. ग्रामीण आणि शहरी भागामध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून घाऊक (होलसेलर) व्यापाऱ्यांनी जीवनावश्यक मालाची कृत्रिम टंचाई करत दरवाढ केली आहे. त्यामुळे त्यांच्याखाली असणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांकडूनही दरवाढ करण्यात येत आहे. या दरवाढीचा मोठा फटका कामगार, शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेला बसत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा आणि दर नियंत्रित ठेवण्याचे आदेश राज्यसरकारने संबंधितांना करावेत अशी लेखी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

देशात संचारबंदी लागू आहे परंतु या अडचणीच्या काळात मागील ३ -४ दिवसांपासून घाऊक (होलसेलर) व्यापाऱ्यांनी मालाची कृत्रिम टंचाई करत दरवाढ केल्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांनीहि दरवाढ केलेली आहे. याचा परिणाम थेट गरीब कामगार, शेतमजूर यांसह सर्वसामान्य जनतेवरही होत असून हे कामगार संचारबंदी काळात घरी बसून असल्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अनेक ठिकाणी व्यापारी कृत्रिम टंचाई करून रास्त दरापेक्षा अधिक किमतीने विक्री करत असल्याच्या तक्रारी दौंडचे आमदार राहुल कुल यांना त्यांनी सुरू केलेल्या हेल्पलाइन नंबरवर मिळाल्या आहेत. त्यामुळे या गोष्टींना आत्ताच पायबंद घातला गेला नाही तर येत्या काळात हि परिस्थिती अजूनही गंभीर होऊ शकते तेव्हा पुणे जिल्हातील जीवनावश्यक वस्तूंच्या कृत्रिम टंचाई आणि वाढत्या दरवाढीबाबत तातडीने दखल घेऊन जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा व दर नियंत्रित ठेवण्याचे आदेश संबंधितांना करावेत अशी लेखी मागणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे तसेच विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनाही याबाबत पत्रव्यवहार केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.