थेऊर | सहकारनामा ऑनलाईन(शरद पुजारी)
पूर्व हवेलीतील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा दिवसा गणिक वाढताना दिसत असून यामुळे हा भाग हाॅटस्पाॅट बनतोय की काय अशी भिती निर्माण झाली आहे.
हडपसर येथील एका नामांकित कंपनीत काम करणारे पाच कामगार जे कदमवाकवस्ती मांजरी बुद्रुक व आळंदी म्हातोबा येथे राहणारे आहेत त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले त्यात आळंदी म्हातोबा येथील रुग्णाच्या लहान मुलासही कोरोनाची बाधा झाली तर मांजरी बुद्रुक येथील एका कामगाराच्या पत्नीसही कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे काल मंगळवारी रात्री उशिरा कळले. त्यानंतर या सर्वांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक सहकारी यांना कोरोना चाचणी करण्यासाठी पुण्यात पाठविण्यात आले असल्याचे लोणी काळभोर प्राथमीक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ दगडू जाधव यांनी सांगितले. लाॅकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात नागरिकांना काही सवलती दिल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी बाहेर गावाहून येणाऱ्या नागरीकांचे प्रमाण वाढत असल्याने यात आणखी धोका वाढताना दिसत आहे. विशेषतः मुंबई व पुणे येथून ग्रामीण भागात अनेकजण येत आहेत यांना विलगीकरण करुन त्यांच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे परंतु अनेकदा अस होताना दिसत नाही. बहुतेक गावात विलगीकरण कक्षाची सोयच नाही त्यामुळे घरातच ठेवले जाते परंतु हे लोक घरात न बसता गावात फिरताना आढळतात या करिता महसूल विभाग व ग्रामसमितीने कडक पावले उचलून कारवाई करणे गरजेचे बनले आहे.