पोलिसांनी पत्रकारांवर ‛जोर’ दाखवला तर ‛राज्यातील’ पत्रकार रस्त्यावर उतरतील, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा इशारा, मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

– कोरोनामुळे राज्यात संचारबंदी असताना पोलिसांकडून सर्वसामान्यांना मारहाण होत असल्याच्या बातम्या आणि व्हिडीओ समोर येत होते मात्र आता पोलिसांनी थेट पत्रकारांनाच मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे राज्यातील पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली असून पत्रकारांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर त्वरित कारवाई करण्यात आली नाही तर राज्यातील पत्रकार रस्त्यावर उतरतील असा इशारा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने दिला असून तसे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे.



कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण देशामध्ये लॉकडाउन करण्यात आले आहे. यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना वगळण्यात आले असून या अत्यावश्यक सेवेमध्ये प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विविध ठिकाणी कोरोना संबंधित वृत्तपत्र आणि वृत्तवाहिणीसाठी वार्तांकन करण्यासाठी गेलेले हिंगोलीतील आयबीएन लोकमतचे पत्रकार

कन्हैय्या खंडेलवाल, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे औरंगाबाद येथील सोशल मीडिया प्रमुख मनोज जाधव,  टिटवाळा जि.ठाणे येथील पत्रकार राजू टपाल, बारामती येथील गोकूळ टांकसाळ, भद्रावती जि.चंद्रपूर येथील दैनिक भूमिपूत्रचे पत्रकार

उमेश कांबळे यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली आहे विशेष म्हणजे आपण पत्रकार असल्याचं हे पत्रकार पोलिसांना सांगत असतानाही आणि तसे आयकार्ड दाखवून देखील पोलिसांनी त्यांना मारहाण केल्याचे समोर आले आहे. मारहाण झाल्यानंतर संबंधीत पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही असा आरोप पत्रकार संघाकडून करण्यात आला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तसे आदेश आहेत मात्र तरीही काही पोलिसांनी दादागिरी करत या आदेशाचं उल्लंघन केलं आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अन्यथा सर्व राज्यभरातील पत्रकार रस्त्यावर उतरतील असा इशारा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्यसंघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे आणि संघटनेकडून देण्यात आला आहे.