ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे दौंड शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत! शिवसेनेकडून नगर पालिकेतील शिवसेना युतीला घरचा आहेर



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

शहरात दौंड नगर परिषदेचे पाणी  पुरवठा योजनेचे काम जीवन प्राधिकरणाच्या देखरेखी खाली सुरू असून खाजगी ठेकेदारामार्फत सदरचे काम करण्यात येत आहे. संबंधित ठेकेदाराच्या मनमानी कारभाराच्या पद्धतीमुळे शहरातील काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असल्याची तक्रार दौंड शिवसेनेकडून होत आहे. 

शिवसेनेचे दौंड विधानसभा संघटक संतोष जगताप यांनी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्याची भेट घेत सदर तक्रारीचे निवेदन दिले आहे.

संबंधित ठेकेदाराने शहरांमध्ये अनेक ठिकाणी नियमबाह्य पणे पाण्याच्या लाईन्स टाकल्या असून हे काम एनर्जी ऑडिट प्रमाणे होत नाही, तसेच  काम सुरू असताना प्राधिकरणाचे संबंधित अधिकारी केव्हाच याठिकाणी हजर राहत नसून ठेकेदाराच्या माणसांच्या देखरेखी खाली काम पूर्ण केले जात आहे त्यामुळे  ही लोकं कामामध्ये मनमानी करत असल्याचे दिसते आहे. 

त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणीपुरवठा होत नाही. विशेषतः नगर मोरी परिसर व  लोखंडे वस्ती परिसरातील लोकांना पाण्याच्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या  संपूर्ण कामाची चौकशी करून सदरचे काम एनर्जी ऑडिट प्रमाणे होते आहे की नाही याची सुद्धा तपासणी करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

लोखंडे वस्ती परिसरातील ड्रेनेज लाईन गेली महिनाभर पूर्णतः बंद असून वारंवार तक्रार करूनही काम होत नाही, त्यामुळे येथील घरांमध्ये सांडपाणी जात आहे ज्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील ड्रेनेज लाईनची सफाई तातडीने करण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा शिवसेनेकडून देण्यात आला आहे. 

दौंड नगर पालिकेमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे 16 नगरसेवक असताना तसेच पाणीपुरवठा व  आरोग्य विभागाचे सभापती सुद्धा युतीचेच( राष्ट्रवादी) असताना शिवसेनेचे पदाधिकारी राहात असलेल्या प्रभागांमध्ये त्यांना अशा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच तक्रार अर्ज व  आंदोलन इशारा देण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे, अशा प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून व्यक्त केल्या जात आहे.

निवेदन देताना विनोद राऊत, संजय लोखंडे, राजेंद्र पाटणकर, दत्तात्रय चव्हाण, रफिक शेख आदी उपस्थित होते