नियमांच्या उल्लंघणामुळे कोरोनाचे संकट वाढले



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन(शरद पुजारी)

लाॅकडाऊनच्या काळात आपले गाव सोडून इतर गावात प्रवेश करणे हे बेकायदेशीर आहे परंतु या जवळपास दीड महिन्याच्या कालखंडात अनेकजण एका गावातून दुसर्या गावात बेफिकीरीने वावरत आहेत. आपल्या नातेवाईकांच्या घरी जाऊन राहत आहेत. यामुळे पूर्व हवेलीतील गावामध्ये कोरोनाचे संकट आणखी गडद होण्याची भिती निर्माण झाली आहे. 

पुणे शहरात ज्या पटीने कोरोना रुग्णांची वाढ होत आहे त्यानुसार हा धोका शहरालगतच्या गावातही वाढू शकतो याचे मुख्य कारण म्हणजे अनेक जणांचा शहरातील नागरिकांशी प्रत्यक्षपणे अथवा अप्रत्यक्षपणे संबंध येत आहे परिणामी पूर्व हवेलीतील कोरोनाने शिरकाव करत दहशत निर्माण केली आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कवडीपाट माळवाडी येथील एका वृद्ध महिलेला मृत्यू पश्चात चाचणीत कोरोना संसर्ग झाला होता हे कळले त्यानंतर आणखी एक महिला पुणे येथून या परिसरात आपल्या जावयाकडे आली होती. तिला त्रास होत असल्याने खाजगी दवाखान्यात दाखल केले परंतु तिला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तिच्या संपर्कातील जावई व इतर नातेवाईक यांची तपासणी झाली. यावरुन पूर्व हवेलीतील कोरोनाच्या रुग्णामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे आपापल्या परिसराच्या सुरक्षेचा जबाबदारी नागरिकांनी उचलली तर शासनाचे काम सोपे होईल. आपल्या परिसरात पाहुणा, अनोळखी व्यक्तीला या कालावधीत मज्जाव केला पाहिजे. तसेच महसूल व पोलिस प्रशासनाला याची सूचना देणे आवश्यक आहे. काॅरंटाईन केलेल्या व्यक्ती समाजात वावरणार नाहीत याची खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे. सुज्ञ नागरिकांनी वेळेचे महत्त्व जाणून जागरुक राहण्याची आवश्यकता असून आलेले संकट दूर करण्यासाठी आता स्वतःच याबाबत खबरदारी घेणे काळाची गरज बनली आहे.