दिव्यांग महिला कर्मचाऱ्याची कोरोनावर मात, पुन्हा कामावर रुजू



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन (शरद पुजारी) 

कोरोनाशी लढाईत दोन हात करण्यासाठी आरोग्य खात्यातील प्रत्येकाचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. या लढाईत अनेक आरोग्य सेवकांनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे. असाच कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रयोगशाळा तज्ञ कांबळे यांना कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण झाली. त्यावर त्यांनी मोठ्या हिमतीने लढा देत त्यावर मात करुन आज पुन्हा कर्तव्यावर हजर झाल्या आहेत.

कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ.मेहबूब लुकडे यांनी सांगितले की येथील प्रयोगशाळा तज्ञ सीमा विजय कांबळे या कोरोना महामारीच्या काळात लोणीकाळभोर येथील कोवीड सेंटर येथे स्वॅब कलेक्शनसाठी कार्यरत होत्या. याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्या दिव्यांग असूनही त्यांनी मोठ्या हिमतीने या आजारावर मात केली. गेली तीन आठवडे त्यांनी घरी राहून आज सोमवारी सकाळी पुन्हा कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात पुन्हा कर्तव्यावर हजर झाल्या यावेळी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ मेहबूब लुकडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्याच्यासोबत सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

या विषयी सीमा कांबळे यांनी आपले अनुभव सांगताना म्हणाल्या की, ज्यावेळी माझी टेस्ट पाॅजिटीव आली त्यावेळी मी थोडं घाबरले परंतु माझे वरिष्ठ सहकारी डाॅ. जाधव आणि लुकडे यांनी मोठे मानसिक बळ दिले. त्यानंतर माझ्या घरातील नातेवाईकाचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने खुपच बर वाटल. हाॅस्पिटलमध्ये असताना तेथे प्रत्येक जण आपापली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत होते वेळेवर औषधोपचार मिळाला आणि दहा दिवसानंतर मला घरी सोडण्यात आले. कोरोनाला घाबरुन जाऊ नका केवळ आपली काळजी घ्या. घरात बसा शासन आपले कर्तव्य चोख पार पाडत आहे आम्ही आमचे काम करतोय आपणही आपली जबाबदारी ओळखा असे त्यांनी सांगितले.