दौंड शहरालगतच्या गावातील कोविड संशयितांच्या स्वॅब तपासणी दौंड रुग्णालयातच व्हावी : पं.स.सदस्य विकास कदम यांची मागणी



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

दौंड शहरालगत असलेल्या लिंगाळी,गोपाळवाडी, गिरिम, खोरवडी,  सोनवडी ,नानविज गावातील तसेच दौंड रेल्वे कॉलनी परिसरातील करोना संशयित रुग्णांचे स्त्राव तपासणीसाठी दौंड येथील रुग्णालयातच घेण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लिंगाळी पंचायत समिती सदस्य विकास कदम यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे. 

या गावातील संशयितांना स्त्राव देण्यासाठी स्वामी चिंचोली येथील कोविड सेंटरला जावे लागत आहे. या कोविड सेंटरला जाण्यासाठी लोकांना३०-३५ किलोमीटर ची पायपीट करावी लागत आहे.या कोविड सेंटरला जाणे त्रासदायक ठरत असून रुग्णांची हेळसांड होत असल्याचा आरोप रुग्ण करत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून या गावातील संशयितांचे स्त्राव दौंड येथील कोविड सेंटरला घेण्यात यावे तसेच करोना बाधित रुग्णांचे उपचार सुद्धा दौंड येथेच करावेत अशी विनंती कदम यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे. नायब तहसीलदार राजेंद्र जाधव यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी विकास कदम,नॅशनल रेल्वे मजदूर युनियन चे पोपट शिंदे, प्रतीक शिंदे,पवन कुमार विंचुरकर,लिंगाळी चे मा. सरपंच नरेश डाळिंबे, नागेश साळवे,सिद्धार्थ माशाळ आदि उपस्थित होते.