‛सैन्य’ धारातीर्थी पडत असताना ‛सेनापती’ मात्र लढतोय..



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

कोरोनाने संपूर्ण जगावर एक प्रकारची दहशत निर्माण केली आहे. जिकडे पाहावं तिकडे कोरोनाने हा..हा कार माजविल्याच्या बातम्या पाहायला मिळत आहेत. अशा वेळी प्रत्येकजण स्वतःचा बचाव करतानाच दुसऱ्यांनाही घरा बाहेर पडू नका रे.. असा मोलाचा सल्ला देत आहे. प्रत्येकाला आपला जीव प्यारा असल्याने घराबाहेर पडताना दहावेळा विचार करूनच बाहेर पडावे लागत आहे. अनेक राजकीय नेते, पुढाऱ्यांनी स्वतःला घरात बंदिस्त करून घेतले आहे. कुणाला भेटायला जायचे नाही आणि कुणी भेटायला आला तर त्याची भेट घ्यायची नाही असा एकसूत्री कार्यक्रम अनेक नेतेमंडळींनी अंगिकारला आहे. कारणही तसेच आहे, कोरोना कधी, कुठे आणि कोणत्या रुपात येऊन भेट घेऊन जाईल याची शाश्वती कुणालाच राहिली नाहीये. त्यामुळे या भयानक महामारीने सर्व जगच स्तब्ध झाले आहे. अशाही परिस्थिमध्ये मात्र काही ठिकाणी ठराविक नेते मंडळींचा वेगळाच चेहरा नजरेस पडत आहे. ना जीवाची पर्वा, ना कोरोनाची कसली भीती फक्त काम एके काम असे सूत्र जणू अंगिकारले आहे. असाच काहीसा प्रकार दौंड तालुक्यातही पहायला मिळत आहे. दौंडचे आमदार राहुल कुल तालुक्याचा आढावा घेण्यासाठी आणि या महामारीच्या काळात जनतेला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांसाठी सतत शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारताना दिसत आहेत. मग तो कोरोना बाधितांचा, स्वस्तधान्याचा, रोजगाराचा, पाण्याचा, आरोग्याचा, शासकीय योजनांचा किंवा विविध जनतेला येणाऱ्या अडचणींचा प्रश्न असो तो सोडविण्यासाठी अहोरात्र झटत असल्याचे दिसत आहे. अनेक नेत्यांच्या घरांची दारे आणि गेट बंद असताना राहूचे आमदारांचे निवासस्थान मात्र सर्वसामान्याच्या अडचणींसाठी कायमच उघडे असल्याचे पाहायला मिळत आहे. या वैश्विक महामारीच्या काळातही ते ज्या स्फूर्तीने काम करत आहेत ते पाहून सर्व सामान्य कार्यकर्ता सुद्धा ‛दादा काळजी घ्या’ असा आदरयुक्त काळजीचा सल्ला देताना दिसत आहे. या महामारीने त्यांच्या जवळचेही काही कार्यकर्ते ‛शिकार’ झाल्याचे आता पुढे येत आहे. मात्र तरीही जनतेच्या हितासाठी  स्वतःची आणि परिवाराची कसलीही काळजी न करता हा योद्धा लढत आहे. सैन्य धारातीर्थी पडत असताना सेनापती मात्र पहिल्या रांगेत उभा राहून लढत आहे हे नक्कीच वाखाणण्याजोगे आहे.