दौंड : जीवनावश्यक वस्तूंची मालवाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाचा पुणे-सोलापूर महामार्गावरील मळद जवळ ‛खून’



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

पुणे ते उस्मानाबाद अशी जीवनावश्यक वस्तूंची मालवाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाचा पाच ते सहा जणांनी चोरीच्या उद्देशाने खून केल्याची गंभीर घटना दौंड तालुक्यातील मळद गावाजवळ घडली आहे. या चोरट्यांमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार ३० मार्च रोजी रात्री १:३० च्या सुमारास काशीनाथ रामभाऊ कदम रा.उस्मानाबाद हा टेम्पो चालक पुणे-सोलापूर महामार्गावरून ‛डाळ’ घेऊन जात असताना दौंड तालुक्यातील मळदजवळ आला असता लघु शंकेसाठी त्याने टेम्पो थांबवला असता त्या टेम्पोमध्ये पाच ते सहाजण ज्यामध्ये एक महिलेचा समावेश होता या सर्वांनी चोरीच्या उद्देशाने टेम्पोमध्ये चढून टेम्पो चालकास व बाजूला बसलेल्या क्लिनरला मारहाण करण्यास सुरुवात केली यामध्ये टेम्पो चालकाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता यातील एकाने त्यास धारदार शस्त्राने छातीमध्ये वर्मी वार करताच टेम्पो चालक काशीनाथ रामभाऊ कदम हा जागेवर कोसळून मृत झाला. यावेळी या चोरट्यांनी टेम्पो चालकाच्या खिशातील २ हजार रुपये तसेच क्लिनरच्या खिशातील ४ हजार रुपये व त्यांचे मोबाईल घेऊन पसार झाले. दौंड पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन टेम्पो चालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकारी हे करत आहेत.