नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस अधिकाऱ्यासह दोनजण शहीद



गडचिरोली : सहकारनामा ऑनलाईन

सध्या देशात कोरोनाने हाहाकार माजवला असल्याने पोलीस यंत्रणा कोरोनाशी लढा देण्यात व्यस्त आहे. या संधीचा फायदा घेऊन नक्षलवादी जास्त आक्रमकपणे पोलिसांना टार्गेट करत असल्याचे दिसत आहे.  गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडमध्ये असणाऱ्या घनदाट जंगलामध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका पोलीस अधिकाऱ्यासह एक पोलीस जवान असे दोघेजण शहीद झाले आहेत. यावेळी झालेल्या धुमश्चक्रीत अन्य तीन पोलीसही जखमी झाले आहेत.

हाती आलेल्या वृत्तानुसार भामरागड तालुक्यातील मोठ्या जंगलामध्ये हे नक्षलवादी लपून बसले होते. भामरागड तालुक्यातील मोठ्या जंगलात  नक्षलवाद्यांविरोधात मोहीम सुरू आहे. त्यानुसार, या मोहिमेंतर्गत C 60 कमांडो पथकातील जवान जंगलात गस्त घालत होते त्यावेळी जंगलात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी या कमांडो पथकावर अचानक गोळीबार सुरू केला यानंतर पोलिसांनीही मोर्चा सांभाळत प्रतिउत्तर दिले मात्र यावेळी या गोळीबारात पथकातील पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने आणि जवान किशोर आत्राम हे शहीद झाले. तर एका पोलीस अधिकाऱ्यासह तिघे जण जखमी झाले आहे. या हल्ल्यातील 3 जखमींना  हेलिकॉप्टरद्वारे नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे.