दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
दौंडच्या ग्रामीण भागात करोनाने चांगलाच शिरकाव केला असताना शहरात सुद्धा वाईट परिस्थिती पहावयास मिळत आहे. शहरात लागोपाठ तीन दिवसांमध्ये जवळपास 25 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील तुकाई नगर, नेहरू चौक पाठोपाठ पानसरे वस्ती ,दिपमला, बंगला साईड या परिसरात सुद्धा बाधित रुग्ण आढळून येत असल्यामुळे या महामारी ने शहरालाच विळखा घालावयास सुरुवात केली आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण शहरावर पुन्हा हा कडक निर्बंध लावून दौंड करांचा प्रवास फिरसे लॉक डाऊन च्या दिशेने होतो आहे की काय अशी भीती सर्वसामान्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. या महामारीशी लढताना प्रत्येकाने प्रशासनाला मदत करणे गरजेचे असताना काही दौंडकर जबाबदारीने वागत नसल्याचे समोर येत आहे व त्याचा त्रास संपुर्ण शहराला भोगावा लागत आहे. करोना या महाभयंकर महामारी बद्दल व त्याच्या दुष्परिणाम बाबतची माहिती झोपडपट्टीत राहणाऱ्या पासून ते उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या प्रत्येकाला आहे, त्यामुळे प्रत्येक जण या महामारीशी लढताना जागरूक राहत आहे जेणे करून संसर्गाची साखळी तुटली जाईल, मात्र शहरातील काही बेफिकर महा भागामुळे संपूर्ण शहरच वेठीस धरले गेले आहे. शहरातील एकाला त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांनी त्याच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. त्याचा अहवाल येणे बाकी होते.ही माहिती या जबाबदार व्यक्तीला होती. त्यामुळे त्याने घरातच राहणे बंधनकारक असताना सुद्धा त्याने असे केले नाही. तसेच ही माहिती मित्रांपासून लपविली. कहर म्हणजे येथेच न थांबता त्या व्यक्तीने आपल्या सहकाऱ्यांसह एका कार्यक्रमाच्या पत्रिका गावभर वाटण्याचे काम केले. त्यानंतर त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव आल्याची माहिती समोर आली आहे . त्यामुळे या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. अनेकांचे घशातील स्त्राव घेऊन प्रयोगशाळेत पाठविले असल्याची माहिती मिळत आहे. ही व्यक्ती कोणा-कोणाला भेटली, कोठे-कोठे फिरली आहे या वरच सध्या शहरात चर्चा सुरू आहे.