तडीपार गुंडाच्या दौंड पोलिसांनी आवळल्या मुस्क्या, वरिष्ठांकडून दौंड पोलिसांचे कौतुक



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी) 

सोलापूर जिल्ह्यातील (सलगर वस्ती, सोलापूर शहर) कुख्यात तडीपार आरोपी विनायक उर्फ बटल्या गौतम सिंधे याने सोलापूर येथे जबरी चोरी केली होती व त्या ठिकाणाहून त्याने पोबारा केला होता. 

बरेच दिवस सोलापूर पोलीस त्याच्या मागावर होते परंतु प्रत्येक वेळेस तो सोलापूर पोलिसांना गुंगारा देत होता. दि.27 ऑगस्ट रोजी बटल्या दौंडला येणार असल्याची माहिती दौंड पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांना बटल्याला जेरबंद करण्याच्या सूचना केल्या. 

महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवा.आसिफ शेख, पांडुरंग थोरात, पो.कॉ. किरण राऊत,अमोल देवकाते, अमोल गवळी, रवी काळे यांच्या पथकाने येथील महाराजा हॉटेल परिसरात सापळा रचला, पोलिसांची चाहूल लागताच बटल्या पळण्याच्या  प्रयत्नात होता परंतु पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. 

पुढील कारवाईसाठी दौंड पोलिसांनी त्याला सोलापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दौंड पोलिसांच्या धाडसी कारवाईचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले आहे.