काय सांगता… लॉक डाउनमध्ये आजारपणात झाली घट!



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन(शरद पुजारी)


संपूर्ण जगाला कोरोना विषाणूचा विळखा पडला असल्याने अनेक देशांमध्ये लाॅकडाऊन करण्यात आले आहे. आपल्या देशात एकवीस दिवसाचा संपूर्ण लाॅकडाऊन जाहिर केल्यानंतर केवळ जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता सर्व व्यापार बंद आहे याचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून आजारी पडणार्या लोकांचे प्रमाण खुप कमी आले असून आरोग्य सेवा देणाऱ्या अनेक डाॅक्टरांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.  आधुनिक जीवनशैलीमध्ये धावपळीचे जीवन जगताना अनेकजण तयार अन्न पदार्थावर ताव मारतात यात तेलकट व साठवलेल्या अन्न घटकाचा समावेश जास्त असतो याचा सरळ परिणाम आरोग्य तक्रारीत वाढ होताना दिसायचा. घरातील ताजे, सकस अन्न दररोज जेवनात असल्यावर आपले आरोग्य चांगले राहते हे सध्याच्या लाॅकडाऊन घरात बसून असलेल्या मंडळींच्या माहितीतून सिद्ध होत आहे. 

 लाॅकडाऊन मुळे प्रत्येक जण आपापल्या घरात तयार झालेले अन्न घेत असल्याने आजारी पडणार्या लोकांच्या प्रमाणात मोठी घट झाल्याचे समोर येत आहे. यावरुन या फसव्या जीवनशैलीच्या आहारी न जाता आपले आरोग्य संपन्न जीवन जगावे असेच यातून दिसून येत आहे. 

सध्या ग्रामीण भागात सेवा देणारे डाॅक्टर या बद्दल स्पष्ट बोलताना दिसतात.केवळ किरकोळ आजार दिसून येत असून असे रुग्ण पण खुप कमी आहेत. थेऊर येथील डाॅ.बाळासाहेब वनवे यांनी सांगितले की गेल्या पंधरा दिवसांत दवाखान्यात येणार्या रुग्णाची संख्या कमी आहे. नागरिकांनी आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी घरातील तयार केलेले अन्न खाल्ले तर आजारी पडण्याचे प्रमाण खुप कमी होईल. याबाबत हवेली तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.सचिन खरात यांनी माहिती देताना प्रत्येक जण सध्या आपापली काळजी घेतो आहे त्यामुळे आजारीपणाच्या संख्येत घट दिसत आहे दवाखान्यात जाण्या ऐवजी फोनवर सल्ला घेतला जात आहे आणि घरगुती उपायही केले जात आहेत. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे घरात राहणे आवश्यक आहे सध्या आपण खुप नाजूक अवस्थेत प्रवेश करत आहेत आता याचा सामाजिक फैलाव होण्याची भिती आहे.हा पंधरा दिवसाचा कालावधी आहे त्यामुळे आपण आपली व समाजाची काळजी घेतली पाहिजे असे सांगत घरातच रहा व आरोग्य संपन्न जीवन जगा असे आवाहन त्यांनी केले.