: वृत्तसेवा
अनेक दिवस सोशल मीडियावर येत असलेल्या पोस्ट आणि एका विदेशी वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमी नंतर आता दक्षिण कोरियाने याबाबत मोठा खुलासा केला असून उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन हे जिवंत असून त्यांची प्रकृतीही उत्तम असल्याची माहिती दक्षिण कोरियाकडून देण्यात आली आहे. याबाबत दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जी यांचे परराष्ट्र विषयांचे सल्लागार मून चंग इन यांनी सीएनएनशी बोलताना किम जोंग उन हे ठणठणीत असल्याची माहिती दिली आहे.
त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याबाबतच्या येणाऱ्या अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे. यापूर्वीही किम जोंग उनच्या मृत्यूचं वृत्त उत्तर कोरियानं फेटाळलं होतं परंतु तरीही किम जोंग उन यांच्या मृत्यूच्या चर्चांनाआणि अफवांना उत आला होता. काही दिवसांपूर्वी किम जोंग उन यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती परंतु त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत होत्या आणि त्यांनतर तर त्यांचा मृत्यू झाल्याच्याही अफवा येत होत्या. परंतु आता दक्षिण कोरियानं दिलेल्या माहितीनंतर त्यांच्या मृत्यूच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.