माळेगाव कारखाण्यावर अजित पवारांची सत्ता!



बारामती : सहकारनामा ऑनलाइन

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखाण्यावर अखेर  अजित पवारांची सत्ता येणार हे आता शिक्कामोर्तब झाले आहे. अजित पवारांनी ग्रामपंचायतीपासून सर्व साखर कारखान्यावर आपली सत्ता काबीज केली आहे मात्र माळेगाव साखर कारखान्यावर  अजित पवार यांना वर्चस्व राखणे शक्य होत नव्हते.

या निवडणुकीला मात्र माळेगावकरांनी अजित पवार यांच्या बाजूने कौल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत निळंकठेश्वर पॅनेलने १८ पैकी १३ जागांवर यश मिळवून माळेगाव साखर कारखान्यात सत्ता परिवर्तन घडवून आणले आहे. चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलला ५ जागा मिळाल्या आहेत. चंद्रराव तावरे व रंजन तावरे हे संचालक म्हणून कारखान्यावर निवडून आले आहेत. राखीव ५ जागांवरील मतमोजणी मंगळवारी सकाळी सुरुच होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याची निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. तसे पाहता चंद्रराव तावरे हे शरद पवार यांचे समर्थक होते. मात्र, अजित पवार यांच्याकडे बारामतीची सुत्रे गेल्यानंतर अजित पवार आणि तावरे यांच्यामध्ये धुसपुस सुरू झाली. २०१४ मध्ये राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर २०१५ मध्ये चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी राष्ट्रवादीच्या पॅनेलचा पराभव केला होता. त्यामुळे आता राज्यात पुन्हा सत्ता आल्यानंतर कारखान्यावरही वर्चस्व मिळविण्यासाठी अजित पवार यांनी आपली ताकद लावली होती. त्यांनी माळेगाव कारखान्याच्या परिसरात ४ सभाही घेतल्या होत्या. रविवारी मतदान झाल्यानंतर सोमवारी मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी अनेक आक्षेप घेतले गेल्याने प्रत्यक्ष मतमोजणी दुपारनंतर सुरु झाली. मंगळवारी सकाळी जाहीर झालेल्या १८जागांपैकी १३ जागा मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत निळकंठेश्वर

पॅनेलने कारखान्यावरील सत्ता खेचून आणली आहे.