आमदार राहुल कुल यांच्या मागणीला उप मुख्यमंत्री अजितदादांचा सकारात्मक प्रतिसाद! शाळा सुरु करण्याबाबत घेतला हा महत्वाचा निर्णय



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दि. 20 जून रोजी मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार करून कोरोनाच्या काळात शाळा सुरू न करण्याबाबत निवेदन दिले होते व शाळा सुरू झाल्यानंतर हजेरी पट कसा भरून काढायचा याबाबतही आपले मत मांडले होते. आमदार राहुल कुल यांच्या या मागणीला आता उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत असून याबाबत अजितदादांनी जो पर्यंत ‘राज्यात करोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याची खात्री पटत नाही, तोपर्यंत शाळा सुरू करण्याचा कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही’ असे मंगळवारी स्पष्ट केले आहे.



त्यांनी याबाबत पुढे बोलताना येणाऱ्या  ‘जुलै आणि ऑगस्ट’ महिन्यामध्ये करोनाची परिस्थिती बिकट होऊ शकते असा अंदाज आहे. त्यामुळे लोकांनी याबाबत जागरूक राहून कोरोनाबाबत ठरवून दिलेले नियम पाळावेत नाहीतर तर मोठी किंमत मोजावी लागू शकते असा इशाराही त्यांनी दिला आहे.

याबाबत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून कोरोना प्रदूर्भावात शाळा सुरू न करण्याबाबत निवेदन दिले होते. याबाब राज्यात करोनाची गंभीर परिस्थिती असूनही शिक्षण विभागाकडून जुलैमध्ये नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत त्यामुळे पालक वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली वरील भूमिका मांडली. कोरोनाच्या उपाय योजनांबाबत बोलताना कोरोना चाचण्या आम्ही वाढविल्या असून त्यामुळे करोनाबाधितांची संख्या वाढली आहे. आता लोकांना परवडेल अशा नवीन चाचण्या आल्या असून, मास्कसोबतच सगळ्या गोष्टींचे दर आटोक्यात आणले जातील. जीवितहानी होऊ नये यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले