मुंबई : वृत्तसेवा
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात अतिशय खालच्या दर्जाला जाऊन वैयक्तिकपातळीवर टीका केल्याप्रकरणी टीव्ही अँकर अर्णब गोस्वामी याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील नेत्यांकडून होत आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्र सरकारकडे कारवाईबाबत मागणी केली आहे.
पालघर मध्ये झालेल्या हत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरत वैयक्तिकरित्या खालच्या पातळीवर घसरून टिकाटिप्पणी केली आणि सामाजिक सलोखाही बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एका राज्याचे मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्यातील काँग्रेस नेत्यांनी केला. त्यामुळे गोस्वामी याच्याविरोधात राज्य आणि केंद्र सरकारने त्वरित कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे. यावेळी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलताना पालघरमधील झालेल्या हत्येच्या घटनेचा जितका निषेध करावा तेवढा कमीच आहे असे म्हणत ही अत्यंत दुख:द घटना असून माणुसकीला काळिमा फासणारी अशी घटना आहे, मात्र या घटनेला कोणत्याही धार्मिक द्वेषाचा दृष्टीकोन नाही पण तरीही काही माध्यमे व राजकीय व्यक्ती या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. हा देशाच्या एकात्मतेला बाधा आणणारा अत्यंत गंभीर प्रकार असून कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्रासह देशातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचा हा अत्यंत निंदनीय प्रकार असल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. समाजामध्ये जातीय, धार्मिक द्वेषाची भावना पसरवण्यासाठी काही माध्यमे जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे, अँकर आणि पत्रकार अर्णब गोस्वामी याने अशाच पद्धतीने सामाजिक द्वेष पसरवणाऱ्या टिप्पणी करून समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप निवेदनात केला गेला आहे. या अँकरने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दलही अत्यंत हीनदर्जाची भाषा वापरून वैयक्तिक पातळीवर टीका केली आहे. त्यामुळे आम्ही सर्व याचा जाहीर निषेध करतो. अशा पद्धतीने केल्या गेलेल्या गोष्टींना पत्रकारिता कसे म्हणता येईल असेही त्यात म्हटलं आहे. आपल्या देशात सामाजिक द्वेष पसरविणे हे देशाच्या एकतेसाठी ते घातक आहे त्यामुळे आम्ही संयुक्तरीत्या सामाजिक वातावरण कलुषित करणाऱ्या अर्णब गोस्वामी आणि संबंधित वृत्तवाहिनीवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्र सरकारकडे केली असल्याचे म्हटले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महासचिव मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, खा. राजीव सातव, कुमार केतकर, बाळू धानोरकर, काँग्रेसचे मंत्री आणि प्रमुख नेते उपस्थित होते.