उरुळी कांचनमधील प्रसिद्ध ‛मिठाई’ झाली ‛कडू’, मिठाईवालाच निघाला कोरोना पॉझिटिव्ह



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

उरुळी कांचनमध्ये सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. पाहता पाहता अनेकजण कोरोनाच्या विळख्यात सापडू लागले आहेत. सध्या उरुळीचे 40 च्या आसपास कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

लॉकडाऊन मध्ये अनेकजण मनमानी करून आपली मुख्य गरजेमध्ये येत नसलेली दुकानेही उघडीच ठेवत असल्याने कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत असल्याचे नागरिक बोलत आहेत. त्यातच आता उरुळी कांचन मध्ये एका मिठाई वाल्याचे दुकान चांगलेच चर्चेत आले असून कोरोना काळात सुरू असलेल्या या दुकानाचा चालकाचाच रिपोर्ट आता कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे गेल्या पाच सहा दिवसांपासून त्या दुकानात जाऊन मिठाई खरेदी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता कदम यांनी उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणाऱ्या या मिठाईवाल्यासह 5 जण कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती दिली. त्यामुळे आता या मिठाईच्या दुकानातून कुणी कुणी मिठाई नेली, कोण संपर्कात आले याची माहिती घेतली असता 18 जणांची यादी समोर आली आहे. या सर्वांचे घशातील नमुने घेऊन ते सरकारी लॅबमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सुचिता कदम यांनी दिली आहे.