आघाडी सरकारविरुद्ध मंगळवारी दौंडमध्ये भाजपचे आंदोलन : आ.राहुल कुल यांची माहिती



दौंड : (सहकारनामा)

राज्यातील महा महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून या सरकारच्या बेफिकिरीमुळे महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी आणि या सरकारच्या कारभाराविरोधात जनजागृती करण्यासाठी मंगळवार दि.२५ फेब्रुवारी रोजी दौंड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी शनिवारी चौफुला येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते आनंद थोरात, जिल्हा सरचिटणीस तानाजी दिवेकर, तालुका अध्यक्ष गणेश आखाडे हे उपस्थित होते.

आ.कुल यांनी पुढे बोलताना अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार आणि फळबागांना ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती पण महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे असे म्हणत नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी करणारे सत्तेत आले तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे का जमा झाले नाहीत असा सवाल आमदार कुल यांनी यावेळी केला.

भाजपा सरकारच्या कर्जमाफीत पीक कर्ज तसेच मध्यम मुदत कर्ज समाविष्ट केल्याने पॉलिहाऊस, शेडनेट, शेती, उपकरण, पशुपालन, शेळीपालन, मधमाशी पालन, अशा सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. भाजपा सरकारच्या व्यापक कर्जमाफीमुळे ४३ लाख खाते धारकांना १९ हजार कोटींचा लाभ देण्यात आला होता. तूर खरेदीचे निकष महाविकास आघाडी सरकारने बदलल्यामुळे शेतकऱ्यांकडून होणाऱ्या खरेदीचे प्रमाण खूप कमी झाले आहे. शेतकऱ्यांची घोर फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा भाजपा तीव्र शब्दात निषेध करीत असल्याचे ते म्हणाले.

स्त्रियांवरील अत्याचराबाबत बोलताना महाआघाडी सरकारच्या काळात गुन्हेगारांना धाक राहिला नसल्याने महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे, मात्र या सरकारचे मंत्री फक्त सत्कार घेण्यात मग्न आहेत. नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे महिला, मुलींमध्ये कमालीची भीती निर्माण झाली असून महिला, मुलींवरील वाढत्या घटनांना आळा घालण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे त्यामुळे भाजपाच्या वतीने या सरकारचा निषेध केला.

मंगळवारी दौंड तहसील कार्यालयासमोर होणाऱ्या धरणे आंदोलनात दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रंजनाताई कुल, कांचनताई कुल, आनंद थोरात, वासुदेव काळे, नामदेव ताकवणे, महेश भागवत, राजाभाऊ तांबे, नामदेव बारवकर, तानाजी दिवेकर, गणेश आखाडे, अशोक फरगडे, सुनील शर्मा, स्वप्नील शहा, फिरोज खान

यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.