कोरोना संसर्गामुळे केडगाव’मधील अंतर्गत रस्ते ‛सील’



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उदयास आलेल्या केडगाव स्टेशन येथे एक कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर येथील अंतर्गत रस्ते सील करण्यात आले आहेत.

केडगावमध्ये एका डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. केडगावमधील बाजारपेठेत होणारी गर्दी हा कायमच चिंतेचा विषय ठरला आहे. संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असताना येथील नागरिक मात्र कोरोनाबाबत गंभीर नसल्याचे या अगोदरही होणाऱ्या गर्दीवरून वेळोवेळी जाणवत होते त्यातच येथील एका डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मात्र कठोर निर्णय घेण्याशिवाय केडगाव ग्रामपंचायत, प्रशासकीय यंत्रणेला पर्याय उरला नसल्याचे आता समोर येत आहे. नागरिकांची कामाशिवाय वाढलेली ये-जा पाहता यापुढेही कठोर निर्णय घेण्यात येऊ शकतात अशी माहिती मिळत आहे.