राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात १० हजार तरूणांची भरती होणार



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात १० हजार तरूणांची भरती करण्याचा निर्णय आज मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला  

अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमातून दिली.

याचा फायदा शहरी व ग्रामीण तरूणांना होईल. त्यांना पोलीस दलात सेवेची संधी मिळेल. ही भरती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरती प्रक्रिया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल, याचा विचार करून सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीनं मांडण्याचे निर्देश दिले. मंत्रिमंडळ मंजुरीनंतर भरती प्रक्रियेची कार्यवाही वेग घेईल. यासोबतच नागपूरच्या काटोलमध्ये राज्य राखीव पोलीस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बटालियनसाठी १३८४ पदं निर्माण करण्यात येणार असून प्रत्येक टप्प्यात ४६१ प्रमाणे ३ टप्प्यात ही पदं भरण्यात येतील. यातूनही शहरी व ग्रामीण युवतींना पोलीस सेवेची संधी मिळणार आहे. राज्यातील सण, उत्सव, सामाजिक-राजकीय मोर्चांमध्ये महिलांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे. नागपूरची भौगोलिक स्थिती, रेल्वे, विमान व दळणवळणाच्या साधनांची उपलब्धता लक्षात घेऊन एसआरपीएफच्या या केंद्रासाठी नागपूर जिल्ह्याची शिफारस करण्यात आली होती. त्याअनुषंगानं काटोल गावच्या हद्दीत शासकीय जमीन उपलब्ध असल्यानं त्याठिकाणी ही बटालियन स्थापन करण्यात येेणार आहे